नवी दिल्ली : विश्वचषकापासून पाकला बीसीसीआय रोखू शकत नाही. बीसीसीआय व प्रशासकांच्या समितीने (सीओए) अश्या मागणीचा कुठलाही अर्ज तयार केलेला नाही. असे पाऊल उचलले तरीही आयसीसीद्वारे हा अर्ज फेटाळला जाईल, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आयसीसीची मॅरेथॉन बैठक २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान दुबईत होईल. दरम्यान, ‘पाकिस्तानला विश्वचषकापासून बीसीसीआय रोखू शकत नाही’, असे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसी संविधानानुसार, सदस्य देशाने पात्रता गाठल्यास आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे पाकला स्पर्धेपासून रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. दरम्यान सीओए प्रमुख विनोद राय व डायना एडुल्जी यांच्या उपस्थितीत सीओएची शुक्रवारी होणाºया बैठकीत या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. पाकला बाहेर काढणारा अर्ज तयार केला, तरी अन्य देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नसून बीसीसीआयकडे बहुमत नाही. यावर मतदान झाले तरी बीसीसीआयचा पराभव निश्चित असेल.