भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांमध्ये क्रिकेट मालिका गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आता मालिका होणे अशक्यच असल्याचे म्हटले जाते. पण या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळवण्यात यायला हवी, अशी इच्छा भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2013नंतर द्विदेशीय मालिका झालेलीच नाही. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेत हे संघ एकमेकांना भिडतील. पण यंदा ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली होती. त्यामुळे आता या स्पर्धेचे यजमानपद दुबईला देण्यात येणार आहे.
फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी झाली होती. पण, हा सामना झाला. बर्मिंगहॅम येथील एडबस्टन स्टेडियमवर कडक सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या सामन्यात भारतानं डकवर्थ लुइस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र दोन्ही देशांमध्ये सामना झालेला नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांवर क्रिकेट विश्वाचे लक्ष असते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामने व्हायला हवेत, अशी इच्छा भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने केली आहे. युवराजने निवृत्ती घेतली असून तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसत आहे.
युवराज याबाबत म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांची साऱ्यांनाच उत्सुकता असते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामने व्हायला हवेत, असे मला वाटते. पण ही माझी इच्छा असली तरी ही मालिका खेळवणे माझ्या हातात नक्कीच नाही. त्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी चर्चा करायला हवी."