नवी दिल्ली : तटस्थ ठिकाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळविण्यास मला काहीच अडचण नाही. जर असे शक्य झाले तर नक्कीच भारत-पाकिस्तानदरम्यान शानदार लढत रंगेल, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट मालिका रंगलेली नाही. या हल्ल्यात १५०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
द्विपक्षीय मालिका आयोजित होत नसल्या तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) स्पर्धांमध्ये भारत-पाक एकमेकांविरुद्ध खेळतात. गेल्या वर्षी भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान दोन्ही देश एकमेकांविरुद्ध खेळले होते. तसेच आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतही भारत-पाकिस्तान न्यूयॉर्कमध्ये भिडतील. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांच्या एका यू-ट्यूब शोमध्ये रोहित सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला भारत-पाक कसोटी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होऊ शकेल का, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर रोहित म्हणाला की, ‘होय, मला पाकिस्तानविरुद्ध खेळताना चांगले वाटेल. दोन्ही देशांदरम्यानचा हा सामना शानदार होईल. आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असतो. मी केवळ क्रिकेटच्या दृष्टीने पाहतोय. ही शानदार लढत होणार असेल, तर का शक्य नाही!’ दरम्यान, या प्रकरणावर आधीच ‘बीसीसीआय’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानसह द्विपक्षीय मालिका खेळविण्याबाबतचा कोणताही निर्णय सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी, पाकिस्तान मात्र भारतासोबत खेळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
इम्पॅक्ट नियम अष्टपैलूंसाठी मारक!रोहित शर्माने यावेळी आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमावर नाराजीही व्यक्त केली. या नियमामुळे भारतात अष्टपैलू खेळाडूंच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळत नसल्याचे त्याने म्हटले. रोहितने म्हटले की, ‘माझ्या मते, या नियमामुळे भारतीय अष्टपैलू खेळाडूंच्या प्रगतीवर मर्यादा येत आहेत. क्रिकेट ११ खेळाडूंसह खेळले जाते, १२ नाही. मी इम्पॅक्ट प्लेअर नियमाच्या पक्षात नाही. भारतीय क्रिकेटसाठी हे चांगले नाही. याबाबत काय करू शकतो माहीत नाही; पण मी या निर्णयाच्या बाजूने नाही.’