आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग'

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:39 AM2019-02-20T11:39:11+5:302019-02-20T11:39:38+5:30

whatsapp join usJoin us
India-Pakistan World Cup clash will be discussed on the sidelines of ICC meeting to be held in Dubai  | आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग'

आले मोठे शहाणे; PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मीटिंग, भारत-पाक सामन्यासाठी करणार 'बॅटिंग'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. भारताच्या अनेक माजी खेळाडूंनीही भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळू नये असाच सूर धरला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( पीसीबी) चिंतेचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीदरम्यान या मुद्यावर पीसीबी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी ( बीसीसीआय) चर्चा करणार असल्याची, माहिती Times Now या इंग्रजी वेबसाइटने दिली.



क्रिकेट आणि राजकारण यांची सरमीसळ करू नये, असे पीसीबीनं आधीच स्पष्ट केलं होतं. पण, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकण्याची शक्यता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीसीबी दुबईत बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे समजते. 2008 नंतर उभय देशांत द्विदेशीय मालिका झालेली नाही. मात्र, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने झाले आहेत. 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि 2018च्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात सामने झाले होते.

27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत दुबईत आयसीसीची बैठक होणार आहे. यात पीसीबी वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर आलेले बहिष्काराचे मळभ दूर करण्याचा प्रयत्न करणात आहे. आयसीसीचे प्रमुख डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले की,'' दोन्ही देशांतील वातावरणावर आम्ही नजर ठेवून आहोत. विश्वचषकात दोन्ही देशांच्या सामन्यांची तिकिट विक्री होणार आहे. पण अजूनही बीसीसीआय किंवा पीसीबी यांनी या सामन्याबाबत आपले मनोगत व्यक्त केलेले नाही. जर दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांना काहीच समस्या जाणवत नसेल तर नक्कीच हा सामना होऊ शकतो."



दरम्यान, वर्ल्ड कपमधील पाकविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्काराच्या मागणीवर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,'' वर्ल्ड कप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू. जर आम्ही खेळलो नाही, तर पाकिस्तानला गुण मिळतील आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा ते समोर आले, तर त्यांना न खेळताच वर्ल्ड कप मिळेल. याबाबत आम्ही अद्याप आयसीसीसोबत संवाद साधलेला नाही.''

Web Title: India-Pakistan World Cup clash will be discussed on the sidelines of ICC meeting to be held in Dubai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.