IND vs NED, T20 World Cup 2022: भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेची सुरूवात धडाक्यात केली. पाकिस्तानसारख्या तुल्यबळ संघाविरूद्ध Team India ने अतिशय महत्त्वाचा विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली आणि अखेर विजयाचे दान आपल्या पदरात पाडून घेतले. पाकिस्तानकडून शान मसूद (५२) आणि इफ्तिखार अहमद (५१) या दोघांनी अर्धशतक ठोकले. भारताकडून हार्दिक पांड्याने संघर्षपूर्ण ४० धावांची खेळी केली. पण विराट कोहलीने मात्र नाबाद ८२ धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवून सुद्धा Rohit Sharma गुरूवारी होणाऱ्या नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यासाठी एका खेळाडूचा संघातून पत्ता कट करणार असल्याची चर्चा आहे.
नक्की कोणाचा संघातून होणार 'पत्ता कट'?
भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) ही एक मोठी परीक्षा टीम इंडियाने उत्तीर्ण केली. आता मेलबर्नवरुन भारतीय संघ आज सिडनीच्या मैदानावर सामना खेळणार आहे. नेदरलँड्स हा संघ तुलनेने दुबळा वाटत असला तरी अनेक संघांना धूळ चारुन त्यांनी सुपर-१२ ही फेरी गाठली आहे. त्यामुळे राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळू शकतो. अक्षर पटेलला पहिल्या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्याला संघातून बाहेर ठेवून त्याच्या जागी संघात लेग स्पिनर Yuzvendra Chahal ला खेळवले जाऊ शकते. रोहितच्या आतापर्यंतच्या निवड प्रक्रियेची पद्धत पाहता, तो युजवेंद्र चहल याला संघात स्थान देऊ शकतो. Axar Patel ने पहिल्या सामन्यात केवळ १ षटक टाकून त्यात २१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याचा 'पत्ता कट' करुन त्या जागी चहलला संघात स्थान देण्याची रणनिती रोहितकडे तयार आहे.
हार्दिक अनफिट, 'या' खेळाडूला मिळू शकते संधी
हार्दिक पांड्या हा अनफिट असल्याची पुसटशी चर्चा रंगली आहे. पाकविरूद्ध Hardik Pandya ने संयमी खेळ करताना विराटसह ११३ धावांची भागीदारी केली. ३७ चेंडूंत २ षटकार व १ चौकारासह ४० धावा करून तो बाद झाला. पण डावाच्या अखेरच्या टप्प्यात त्याच्या पायात क्रॅम्प आल्याचे दिसले आणि त्यामुळे त्याने सराव सत्रातून विश्रांती घेतली. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली. तसे झाल्यास, रोहित शर्मा रिषभ पंतला संघात खेळवण्याचा नक्कीच विचार करेल असेही क्रिकेट जाणकारांचे मत आहे.
असा असू शकतो भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (हार्दिक अनफिट असल्यास), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग