Virat Kohli, India Playing XI vs England 2nd ODI : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) संघासोबत प्रवास करतोय, परंतु त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दुखापत झाल्यामुळे विराटला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्याला मुकावे लागले होते. भारताने पहिल्या वन डे सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा हे या विजयाचे नायक ठरले. आता दुसरा सामना गुरुवारी होणार आहे आणि त्यातही विराटच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
''इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांचा विचार करण्यात आला नाही. विराटच्या मांडीवर सौम्य ताण आहे तर अर्शदीपच्या उजव्या पोटात ताण आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे,''असे बीसीसीआयने सांगितले होते. त्यामुळे विराट ड्रेसिंग रुममध्ये बसून मॅच पाहताना सर्वांना पाहिला. त्याने काही चाहत्यांसोबत सेल्फीही घेतली आणि ऑटोग्राफही दिला. विराटची दुखापत अजूनही बरी झालेली नाही आणि तो दुसऱ्या वन डेत खेळण्याची शक्यता कमीच आहे.
विराट संघात परतणार नसल्याने कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही. रोहित व शिखर यांनी पहिल्या वन डेत ११४ धावांची भागीदारी करून विजय मिळवून दिला होता. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव व रिषभ पंत हे नंतर फलंदाजीला तयार होतेच. हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंसह टीम इंडिया पहिल्या वन डेत मैदानावर उतरली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा व युजवेंद्र चहल हे चार गोलंदाज खेळले होते.