India Playing XI vs Pakistan : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न पाहत आहे. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला साखळी फेरीतही प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे यंदा भारतीय संघाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामन्यांतून प्लेइंग इलेव्हन ठरवण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला, परंतु न्यूझीलंडविरुद्धचा सराव सामना पावसामुळे रद्द झाला अन् रोहितच्या प्लान्सवर पाणी फिरले. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन खेळाडूंमधून एकाच निवड करताना रोहितची तारांबळ होताना दिसतेय.
इंग्लंडसह श्रीलंका, यूएई संघाला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियातून आली चाहत्यांचं टेंशन वाढवणारी बातमी
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने प्लेइंग इलेव्हन ठरल्याचे स्पष्ट केले होते. अखेरच्या क्षणी कोणताच बदल करणे आवडत नसल्याचे स्पष्ट करताना रोहितने सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची स्पष्ट कल्पना दिल्याचेही म्हटले. पण, तरीही सराव सामन्यातील कामगिरीनंतर काही बदल अपेक्षित आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी मुख्य संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात २०व्या षटकात चार ( एक रन आऊट) विकेट्स घेत ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्याच्या समावेशाची शक्यता वर्तवली जात आहे.
भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंह यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे हे निश्चित आहे. रोहित व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना आता मोहम्मद शमी व हर्षल पटेल यांच्यापैकी कोणाला खेळवायचे हा प्रश्न सतावतोय. हर्षलने दुखापतीतून पुनरागमन केले खरे, परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने २/२७ अशी, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३/३० अशी कामगिरी केली. पण, शमीची एक ओव्हर वरचढ ठरली. आयपीएल २०२२मध्येही शमीने उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलनंतर तो प्रथमच ट्वेंटी-२० क्रिकेट खेळतोय.
भारताची प्लेइंग इलेव्हन वि. पाकिस्तान ( India Playing XI vs Pakistan)
- रोहित शर्मा ( कर्णधार)
- लोकेश राहुल
- विराट कोहली
- सूर्यकुमार यादव
- हार्दिक पांड्या
- दिनेश कार्तिक
- अक्षर पटेल
- आर अश्विन/युजवेंद्र चहल
- भुवनेश्वर कुमार
- मोहम्मद शमी / हर्षल पटेल
- अर्शदीप सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"