डऱ्हम : भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयंक अग्रवाल याला आज मंगळवारपासून कौंटी संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन दिवसाच्या सराव सामन्यात दमदार कामगिरी करण्याची संधी असेल. या सामन्यात ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल हा यष्टिरक्षणाची धुरा सांभाळणार आहे.
हा सामना प्रथमश्रेणी दर्जाचा आहे, मागच्या अनेक वर्षांत पहिल्यांदा भारतीय संघ असा सामना खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या मते, अधिकृत सामना असेल तर सर्व खेळाडूंना सरावाची संधी मिळत नाही. संघ व्यवस्थापन मात्र कसोटी मालिका सुरू होण्याआधी संघाला सरावाची संधी मिळावी, यासाठी असा सामना आयोजित करण्याच्या बाजूने होते. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानुसार, पंतने लंडनमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला. तो आता बरा आहे, पण डऱ्हम येथे संघाच्या बायोबबलमध्ये कधी परतणार, याची माहिती नाही. त्याला आता कुठलीही लक्षणे नाहीत. पण सराव सामन्यात खेळण्याआधी फिटनेस चाचणी होणे क्रमप्राप्त आहे.
पंत आणि साहा हे दोन्ही खेळाडू पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध आहेत. शुभमन गिल जखमी होऊन बाहेर पडल्यानंतर मयंक अग्रवाल याच्या कामगिरीकडे नजरा लागल्या आहेत. रोहित शर्मासोबत सलामीला मयंक येईल, अशी शक्यता आहे. पण तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियात रोहित दाखल होताच मयंकला अंतिम एकादशबाहेर काढण्यात आले. दुसरीकडे राहुलने कसोटीत दोन हजार धावा केल्या. त्यातील बऱ्याचशा धावा सलामीला खेळून केल्या आहेत.
सिराज, बुमराहकडे लक्ष
- या दौऱ्यात मात्र राहुलचा समावेश मधल्या फळीतील फलंदाज म्हणून होऊ शकेल. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह कसा मारा करतात, याकडे लक्ष असेल.
- तीन दिवसांच्या सराव सामन्यात दुसरा डाव होण्याची शक्यता नाही. कौंटी एकादश संघात अनेक युवा चेहरे आहेत.
- जेम्स ब्रासे हा एकमेव अनुभवी खेळाडू असला तरी, सध्याच्या राष्ट्रीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
Web Title: india practice match against the county team from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.