धर्मशाला : भारताने वेस्ट इंडीज पाठोपाठ श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका देखील जिंकली. शनिवारी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात लंकेवर सात गडी राखून तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली, तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना आज रविवारी याच मैदानावर होईल.
सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ७४, ६ चौकार आणि ४ षटकार ), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१८ चेंडूत नाबाद ४५) यांनी धुवांधार फलंदाजी करीत श्रीलंकेचे आव्हान १७.१ षटकातच ३ बाद १८६ धावा करीत पूर्ण केले. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने विजयाचा सपाटा लावताना सुसाट वेग धारण करत आपला विजयरथ पुढे हाकला आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी, सलामीवीर पाथूम निसांकाची झंझावाती अर्धशतकी खेळी (७५) तसेच मधल्या फळीतील दासून शनाकाच्या नाबाद ४७ धावांच्या बळावर श्रीलंकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ अशी दमदार मजल गाठली.
सुरुवातीच्या ११ षटकात ७६ धावात तीन फलंदाज गमविल्यानंतरही लंकेच्या फलंदाजांनी हार मानली नाही. अखेरच्या पाच षटकात ८० धावांचा झंझावात करीत भारताला १८४ धावांचे लक्ष्य दिले. भारताने अखेरच्या चार षटकात ७२ धावा मोजल्या. निसांकाने ५३ चेंडूत ११ चौकारांसह ७५ धावा केल्या. शनाकाने अवघ्या १९ चेंडूत पाच षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ४७ धावांचे योगदान दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड़ मालिकेबाहेर गेला असून त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी मिळाली. त्याचबरोबर श्रीलंका संघाचे कुशल मेंडिस आणि फिरकीपटू महिश तीक्ष्णा हे देखील स्नायू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. डिसेंबर २००९ पासून श्रीलंकेच्या संघाने भारताविरुद्ध चार वेळा टी-२० मालिका खेळली आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही.
सर्वोच्च लक्ष्य गाठले
भारताने लंकेविरुद्ध १८३ धावांचे लक्ष्य १८ व्या षटकात गाठले. हा देखील एक विक्रम ठरला. सांखिकीतज्ज्ञ शिवा जयरामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने याआधी अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध १६५ धावांचे लक्ष्य १८ व्या षटकाआधीच गाठले होते.
भारताचा लंकेवर दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून विजय
- भारताचा हा सलग ११वा टी-२० विजय ठरला. तसेच भारताने सलग ७ टी-२० मालिका जिंकली.
- रोहीत शर्मा घरच्या मैदानावर टी-२० मधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १७ पैकी १६ सामने जिंकलेले आहेत.
- घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-२० सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये भारत न्यूझीलंडसोबत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी ३९ सामने जिंकले आहेत.
- दुश्मंत चमीरा टी-२० मध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज ठरला. त्याने ५ वेळी रोहितला बाद केले आहे.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकात ५ बाद १८३ धावा. (पाथूम निसांका ७५, दानुष्का गुणतिलका ३८, दासून शनाका नाबाद ४७), अवांतर : ११, गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३६/१, जसप्रीत बुमराह २४/१, हर्षल पटेल ५२/१, युझवेंद्र चहल २७/१, रवींद्र जडेजा ३७/१. भारत : १७.१ षटकांत ३ बाद १८६ धावा. ( श्रेयस अय्यर ७४, रवींद्र जडेजा ४५, संजू सॅमसन ३९,), अवांतर : ११, गोलंदाजी : लाहिरु कुमारा ३१/२, दुश्मंत चमीरा ३९/१.
Web Title: india put t20 series in pocket against sri lanka shreyas iyer unbeaten half century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.