माऊंट माऊंगानुई (न्यूझीलंड) : शानदार विजयासह सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाची नजर न्यूझीलंडविरुद्ध आज शनिवारी खेळल्या जाणा-या दुस-या वन डेत विजय नोंदवित पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी संपादन करण्याकडे लागली आहे. दुसरीकडे खराब फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडपुढे विजय नोंदवून बरोबरी साधण्याचे आव्हान असेल.
बुधवारी झालेल्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडचे फलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या फिरकीपुढे नतमस्तक झाले होते. शिवाय वेगवान मोहम्मद शमी याने प्रारंभी दिलेल्या धक्क्यातून संघाला सावरणे कठीण गेले. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय नोंदवित येथे दाखल झालेल्या भारताच्या आत्मविश्वासाचे यजमान संघाकडे कुठलेही उत्तर नव्हते.
पहिल्या सामन्यात मावळत्या सूर्याची प्रखर किरणे असह्य झाल्याने दोन्ही संघाचे खेळाडू मैदानातून परतले होते. त्यामुळे खेळ अर्धा तास थांबवावा लागला. भारताने विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मधल्या फळीत कोण खेळेल हे निश्चित केले नसले तरी पहिल्या सामन्यात विजय नोंदविणारा संघ येथेही कायम राहील, अशी शक्यता आहे. हार्दिक पांड्यावरील बंदी उठताच तो न्यूझीलंडकडे रवाना झाला. तिसºया सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. मॅकलिन पार्कवर अष्टपैलू विजय शंकर याला संधी मिळाली होती पण येथे रवींद्र जडेजाचे पुनरागमन देखील शक्य आहे. अंबाती रायुडू याला देखील पुन्हा संधी दिली जाईल. पहिल्या सामन्यात नाबाद ७५ धावा ठोकणारा शिखर धवन संघाच्या जमेची बाजू असेल. २८ जानेवारी रोजी होणारा तिसरा सामना खेळल्यानंतर कोहली स्वत: विश्रांती घेणार आहे. अशावेळी शुभमान गिल याला खेळण्याची संधी असेल. न्यूझीलंडने भारता विरुद्ध मागील मालिका ४-० ने जिंकली पण या मालिकेत खेळ न सुधारल्यास भारत बाजी मारू शकतो. (वृत्तसंस्था)
।उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमान गिल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या.
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लाथम, मार्टिन गुप्तिल, कोलिन डे ग्रॅन्डहोमे, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, डग ब्रेसवेल, लोकी फग्युर्सन, मॅट हेन्री, कोलिन मुन्रो, ईश सोढी, मिशेल सेंटनेर, टिम साऊदी.
Web Title: India ready to take the lead, challenge to cope with New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.