Join us  

३१ वर्षांची प्रतीक्षा संपविण्यास भारत सज्ज; रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी आजपासून.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 7:31 AM

Open in App

सेंच्युरियन : भारतीय संघ बरोबर ३६ दिवसांआधी वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. ती निराशा संपवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे नवे आव्हान स्वीकारण्यास रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सज्ज पुन्हा सज्ज झाला आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका मंगळवारी सुरू होत असून ही मालिका जिंकल्यास ३१ वर्षांपासूनची विजयाची प्रतीक्षा संपणार आहे. 

१९९२ पासून भारताची दक्षिण आफ्रिकेत ही नववी कसोटी मालिका आहे. आतापर्यंत एकाही कर्णधाराला येथे मालिका विजयाची पताका उंचविता आलेली नाही. सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यावर पावसाचे सावटदेखील कायम आहे. सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान असून चेंडू अनियमित उसळी घेतो. त्यामुळे लढत चुरशीची होईल, असे मानले जात आहे. 

भारतीय संघातील काही स्टार खेळाडूंचा हा अखेरचा दक्षिण आफ्रिका दौरा असू शकेल. त्यामुळे हा दौरा अविस्मरणीय करण्यास ते उत्सुक असावेत. सलामीवीर यशस्वी जैस्वालची खरी परीक्षा असेल ती कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन आणि गेराल्ड कोएत्झी यांच्यापुढे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थितीत मोठी खेळी करण्याचे लक्ष्य असेल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेदेखील जैस्वाल आणि गिल यांनी खेळाची शैली बदलावी या मताचे नाहीत. त्यांच्या मते खेळाडूंनी आपल्या शैलीतच खेळायला हवे पण परिस्थितीचे भान जपावे. 

रोहित शर्माचे हूक तसेच पूलचे फटके किती परिणामकारक ठरतील, विराट काेहली ऑफ स्टम्पबाहेर जाणारे चेंडू किती काळ सोडताना दिसेल, तसेच मोहम्मद शमीची पोकळी कशी भरून काढता येईल, या तीन मुद्द्यांवर भारताची कामगिरी विसंबून असेल. शमीच्या जागी मुकेश कुमार किंवा प्रसिद्ध कृष्णा यापैकी कुणा एकाची वर्णी लागेल.  या सामन्यात लोकेश राहुल यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडणार असून तो यष्टीमागे किती यशस्वी ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघात उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. हे गोलंदाज युवा फलंदाजांना त्रास देऊ शकतात. मालिकेनंतर निवृत्तीची आधीच घोषणा करणारा डीन एल्गर स्टायलिश ऐडन मार्कराम, युवा टोनी डी जार्झी आणि किगन पीटरसन आणि कर्णधार तेम्बा बावुमा हे दक्षिण आफ्रिकेचे उत्तम फलंदाज आहेत. हे भारतीय गोलंदाजांना घाम गाळण्यास भाग पाडू शकतात.

सेंच्युरियनमध्ये मंगळवारी ७५ टक्के मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सामन्यात सुरुवातीच्या तीन दिवसांत पाऊस हजेरी लावणार आहे. सोमवारी पावसामुळे भारताचे दुपारचे सराव सत्रदेखील रद्द करण्यात आले. अशावेळी पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ होण्याची शक्यता कमीच आहे. 

अश्विन बाहेर...

संघ संयोजनामुळे या सामन्यातदेखील रविचंद्रन अश्विन याला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. सुपरस्पोर्ट्स पार्कवर चार दिवसांत सामन्याचा निकाल लागतो पण, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यास दुसऱ्या दिवसापासून फलंदाजी करणे कठीण काम असेल.

रोहितला संधी...

ही मालिका जिंकल्यास रोहित हा द. आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार बनेल. द. आफ्रिका दौऱ्यात मोहम्मद अझहरूद्दीन (१९९२), सचिन तेंडुलकर (१९९६) आणि सौरव गांगुली (२००१) यांच्या नेतृत्वात भारतीय संघ अपयशी ठरला. दुसरीकडे राहुल द्रविड (२००६-०७), आणि महेंद्रसिंग धोनी (२०१०-११ आणि २०१३-१४) तसेच विराट कोहली (२०१८-१९ आणि २०२१-२२) यांनी कसोटी सामने जिंकले पण त्यांनाही मालिका जिंकण्यात अपयश आले होते.

६६ धावा केल्यास...

विराटने द. आफ्रिकेविरुद्ध २४ कसोटीत ३ शतकांसह १२३६ धावा केल्या. २५४ ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी. त्याने एका वर्षांत २ हजार आंतरराष्ट्रीय धावा ठोकण्याची किमया सहावेळा साधली.  कोहलीने पहिल्या कसोटीत ६६ धावांची खेळी केल्यास, तो एका वर्षांत सातव्यांदा २ हजार धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी होईल.

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्‌स, लाइव्ह स्ट्रिमिंग: डिझ्ने हॉटस्टार

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका