Join us  

लंकेचा ‘सूर्या’स्त होणार! टी-२० मालिकेत क्लीन स्वीप देण्यास भारत सज्ज

तिसरा व अखेरचा सामना जिंकून निर्विवाद वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 10:08 AM

Open in App

पल्लेकल : भारतीय क्रिकेट संघ सलग तिसरा टी-२० सामना जिंकून यजमान श्रीलंकेला तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने मंगळवारी खेळेल. भारताने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली असून, आता तिसरा व अखेरचा सामना जिंकून निर्विवाद वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य आहे. 

श्रीलंकेच्या मधल्या फळीकडून मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकण्यासाठी त्यांना विश्वविजेत्या भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. भारताने आतापर्यंत खेळाच्या तिन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी केली आहे. कोणत्याही क्षणी भारतीय खेळाडू दडपणात दिसले नाहीत. भारतीय फलंदाजांनी लंकेच्या प्रमुख गोलंदाजांवरच हल्ला चढवताना त्यांची ताकद कमी केली. 

विशेष म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वत: पुढाकार घेत नेतृत्व केले आहे. त्याने दोन्ही सामन्यांत ५८ आणि २६ धावांची आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याच्या नेतृत्वात भारतीयांनी आक्रमक खेळ केला. दुसऱ्या सामन्यात भारताने फलंदाजीत बदल करताना दुखापतग्रस्त शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला खेळवले. परंतु, सॅमसनला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो धावांचे खातेही न उघडता परतला. त्यामुळे अखेरच्या सामन्यात गिलची निवड होणार की पुन्हा सॅमसनला संधी देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दुसरीकडे, श्रीलंकेच्या फलंदाजीत पथुम निसांका (१११ धावा) आणि कुसल परेरा (७३) या अनुभवी फलंदाजांनीच आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. दोन्ही सामन्यांत लंकेची फलंदाजी पॉवर प्लेनंतर अपयशी ठरली. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेला दमदार कामगिरी करावी लागेल.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्सलाइव्ह स्ट्रिमिंग : सोनी लिव्ह

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंकाटी-२० क्रिकेट