भारताने कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजवर संपूर्ण वर्चस्व गाजवले असून आता ‘व्हाईट वॉश’ करण्यास संघ सज्ज आहे. प्रतिस्पर्धी संघावर खेळाच्या तिन्ही प्रकारात वर्चस्व गाजविण्यासाठी संघाला काही विशेष गुणांची गरज असते.
एकदिवसीय आणि टी२० मालिकेत जे घडले त्यापेक्षा वेगळे काही कसोटी मालिकेत घडताना दिसत नाही. या तिन्ही मालिकांदरम्यान भारतीय वेगवान गोलंदाजांचा मारा पाहणे रंजक ठरले. कधीकाळी क्रिकेट विश्वात दरारा असलेल्या विंडीज भारतीय वेगवान माऱ्याने अडचणीत आणले.
जसप्रीत बुमराह हा गेमचेंजर आहेच, पण मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनीही टिच्चून मारा केला. जुन्या चेंडूवर योग्य लय आणि वेग सांभाळून मारा करणे आणि त्यातही विविधता जोपासणे हे इशांतच्या गोलंदाजीत सुधारणा घडून आल्याचे लक्षण आहे.रवींद्र जडेजाचेही कौतुक करावे लागेल. एकदिवसीय किंवा कसोटी प्रकारात नियमित प्रकारे खेळत नसताना जडेजाने स्वत:वरील विश्वास सार्थकी लावला. संघाला गरज असेल त्या- त्यावेळी जडेजाने कामगिरी केली. विश्वचषक असो वा ही कसोटी मालिका त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान दिले आहे.
अजिंक्य रहाणेला मैदानावर परतल्यानंतर धावा काढताना पाहून आनंद झाला. त्याच्यात धावांची भूक आहे. स्वत:वरचा विश्वास ढळू न देता हा फलंदाज कसोटीत योगदान देत असल्याने दीर्घकालिन उपयुक्त खेळाडू ठरू शकतो. विंडीजबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे खेळाडू मैदानावर कामगिरी करण्यात कमी पडत आहेत. संघात गुणवत्ता आहे, पण ते मैदानावर व्यक्त होत नाही. विंडीज संघव्यवस्थापनाने यावर फोकस करायला हवे. एकूणच नाणेफेक जिंकल्यानंतरही प्रथम फलंदाजी घेतली तरी विराट कोहली व सहकाऱ्यांची परीक्षा घेण्यासाठी मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक असेल. रोच व गॅब्रियल यांचा अपवाद वगळता या संघाचा वेगवान माराही भारतीयांना फारसा त्रस्त करू शकला नाही. दुसºया कसोटीतही चित्र वेगळे असेल, असे मला तरी वाटत नाही. (गेमप्लान)