- अयाझ मेमन
बांगलादेशविरुद्धची टी२० मालिका क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणे एकतर्फी रंगली नाही. पहिल्या सामन्यात अनपेक्षितपणे झालेल्या पराभवानंतर भारतीयांनी जबरदस्त पुनरागमन केले. रोहित शर्माच्या दमदार नेतृत्वाखाली भारताने सलग दोन सामने जिंकत मालिकेवर वर्चस्व राखले. गुणफलकावरून मालिका किती अटीतटीची झाली हे कळणार नाही, पण आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला या मालिकेतून अनेक चेहरे मिळाले. त्यामुळे आता भारतीय संघाला सावध आणि भक्कमपणे वाटचाल करावी लागेल. या मालिकेतील भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड पुढीलप्रमाणे...
शिखर धवन (5/10)
प्रत्येक सामन्यात धवनने चांगली सुरुवात केली, मात्र त्याचा फायदा घेण्यात त्याला यश आले नाही. याशिवाय त्याने या मालिकेत स्वत:ची धोकादायक फलंदाज अशी ओळखही निर्माण केली नाही. टी२०मध्ये त्याच्यासारख्या फलंदाजाचा १०७ इतका स्ट्राइक रेट असणे नक्कीच चांगली बाब नाही.
रोहित शर्मा (7.5/10)
दुसऱ्या सामन्यात केलेली झंझावाती ८५ धावांची खेळी सोडली, तर या मालिकेत रोहितच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाहीत. पण कर्णधार म्हणून त्याने छाप पाडली. विशेष करून अखेरच्या सामन्यात त्याने चतुराईने गोलंदाजांचा वापर करत बांगलादेशला नमविले.
लोकेश राहुल (5/10)
अखेरच्या सामन्यात महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत राहुलने सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले. पण याव्यतिरिक्त त्याला मालिकेत म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. धवनप्रमाणे त्यालाही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात यश आले नाही.
श्रेयस अय्यर (7.5/10)
मालिकेत अय्यरने भारताकडून सर्वाधिक धावा काढल्या. त्याच्याकडे ताकद आणि टायमिंग असून तो रोहितप्रमाणे आपल्या मनासारखी फटकेबाजी करू शकतो. अखेरच्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाने प्रतिकूल परिस्थितीतून आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
रिषभ पंत (3/10)
पंतसाठी ही मालिका निराशाजनक ठरली. केवळ दोन सामन्यांत फलंदाजीची संधी मिळाली, पण त्याला फारकाही करता आले नाही. याशिवाय यष्ट्यांमागेही त्याने निराशा केली. त्याचे वय कमी असून त्याच्यात मोठी गुणवत्ता आहे. पण पंतला आता लवकरच स्वत:ला सिद्ध करण्याआठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.
शिवम् दुबे (5.5/10)
आक्रमक फटकेबाजी आणि सातत्याने बळी घेण्याच्या कामगिरीने शिवम्ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्ष वेधले. अखेरच्या सामन्यात त्याने मोक्याच्या वेळी ३ बळी घेत आपला दणका दिला. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर निवडकर्त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरविला.
मनीष पांड्ये (6/10)
मालिकेत मनीषला फारशी संधी नाही मिळाली. अखेरच्या सामन्यात मिळालेल्या संधीतून त्याने आपला दर्जा सिद्ध करून दाखविला. त्याने आपल्या आक्रमक फटकेबाजीने लक्ष वेधले.
कृणाल पांड्या (2/10)
हुकमी अष्टपैलू म्हणून विश्वास ठेवण्यात आलेल्या कृणालकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. फलंदाज म्हणून त्याला मर्यादित संधी मिळाली; पण गोलंदाज म्हणून तो पूर्णपणे अपयशी ठरला.
वॉशिंग्टन सुंदर (5.5/10)
सुंदरने आपल्या छोटेखानी आक्रमक खेळीने छाप पाडली. गोलंदाजीत त्याने आपला पूर्ण कोटा वापरला. तरी त्याने केवळ एक बळी मिळवला, मात्र त्याचवेळी त्याने धावांवरही अंकुश लावला.
युझवेंद्र चहल (6.5/10)
टिच्चून मारा करताना चहलने चलाखी दाखवली. संघाच्या गरजेनुसार मारा करताना बळी मिळवले. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला.
दीपक चाहर (9/10)
अखेरच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेत भेदक मारा करताना दीपक बांगलादेशसाठी कर्दनकाळ ठरला. चतुराईने गोलंदाजी करताना दीपकने वैविध्य राखले. यामुळे बांगलादेशचे फलंदाज दबावाखाली राहिले.
खलील अहमद (3/10)
खलीलसाठी ही मालिका निराशाजनक ठरली. त्याच्या डावखुºया शैलीमुळे भारतीय गोलंदाजीमध्ये वैविधता येते. मात्र या मालिकेत त्याचे नियंत्रण लुप्त झाल्याचे दिसले आणि यामुळे खलील महागडा ठरला. त्याला पुनरागमनाची गरज आहे.
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
Web Title: India received many faces for the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.