लंडन : ‘भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर अधिक विसंबून असतो, असे म्हणणे चुकीचे आहे,’ असे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने म्हटले. इंग्लंडविरुद्ध पहिले दोन्ही कसोटी सामने गमविण्यामागे तयारीचा अभाव असल्याचे कारण संगकाराने दिले.
वृत्तसंस्थेशी बोलताना संगकारा म्हणाला, ‘आम्ही गेल्या काही वर्षांत विराटला अशी फलंदाजी करताना पाहिले आहे. तथापि, संघात इतर खेळाडूही शानदार असल्याने संघ केवळ विराटवर विसंबून असतो, असे म्हणणे हा अन्य खेळाडूंवर अन्याय ठरेल. पुजारा व रहाणे चांगले फलंदाज आहेत. दोघांचीही कसोटी धावांची सरासरी ५० इतकी आहे. लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, दिनेश कार्तिक यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कसोटी मालिकेआधी भारताला केवळ एक सराव सामना आणि तो ही तीन दिवसांत संपविण्यावरून वाद उद्भवला. भारताला कमी तयारीचा मोठा फटका बसला.’
‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये बॅकफूटवर येण्यामागील मोठे कारण तयारीचा अभाव आहे. यापुढे कठोर मेहनत घेण्याची संघाला गरज आहे. कसोटी खेळताना तयारी करता येत नाही. सराव आणि प्रशिक्षणादरम्यान इंग्लंडच्या गोलंदाजीवर तोडगा शोधून भारतीयांनी स्वत:चा आत्मविश्वास उंचवायला हवा होता. इंग्लिश गोलंदाजांनी भारतीयांच्या कमकुवतपणाचा लाभ घेतल्याने खेळाडूंवर तोडगा शोधण्याची वेळ आली,’ असेही संगकाराने म्हटले. (वृत्तसंस्था)
भारताला ‘क्लीन स्वीप’देऊ असे म्हणणे घाईचे - जॉनी बेयरेस्टो
पाहुणा संघ रविवारी लॉर्डस्वर डावाच्या फरकाने अपमानास्पद स्थितीत पराभूत झाला. इंग्लंड संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला तरी बेयरेस्टोच्या मते, भारतीय संघात मालिकेत मुसंडी मारण्याची क्षमता आहे. ‘द डेली टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत बेयरेस्टो म्हणाला,‘स्थानिक परिस्थितीत कसे खेळायचे हे ठाऊक असल्याने आम्ही परिस्थितीचा लाभ घेतला.
पण तरीही भारत कमकुवत आहे, असे मी मानणार नाही. भारत नंबर वन असून अद्याप बरेच क्रिकेट खेळणे शिल्लक आहे. ५-० ने मालिका विजय हा विचार अतिघाईचा ठरेल. वातावरण पुन्हा एकदा बदलू शकते. साऊथम्पटन आणि ओव्हलची खेळपट्टी शुष्क असू शकते. तरीही आम्ही मालिकेत आघाडीचा लाभ घेत कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही.’
स्टोक्सची इंग्लंड संघात निवड
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध मिळविलेल्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सचा तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी इंग्लंडने तिसºया कसोटी सामन्यासाठी १३ सदस्यांच्या संघाची घोषणा केली, ज्यात स्टोक्सचा समावेश नव्हता. मात्र, ब्रिस्टल न्यायालयाने मारहाणी प्रकरणी स्टोक्सची निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Web Title: India is relying on Kohli, it is wrong to say - Sangakkara
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.