सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या भारताच्या पराभवामध्ये फलंदाजांचे अपयश दिसून आलेच, परंतु त्याहून मोठे दु:ख झाले ते गोलंदाजांचे अपयश पाहून. काही दिवसांपूर्वीच भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितले होते की, ‘जगातील कोणताच प्रशिक्षक शमीची क्षमता राखून असलेला गोलंदाज घडवू शकत नाही.’ म्हांब्रे यांचे हे मत पहिल्या कसोटीनंतर सिद्धच झाले आहे.
डीन एल्गर, डेव्हिड बेडिंगहम आणि मार्को यान्सेन यांनी पहिल्या कसोटीत सहजपणे शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा वेगवान मारा चोपून काढला. यातही पदार्पण केलेल्या प्रसिद्धकडून मोठी निराशा झाली. नक्कीच त्याच्यात अनुभवाची कमतरता होती, मात्र गोलंदाजी अत्यंत सुमार झाल्याने त्याला तळाच्या फलंदाजांवरही वर्चस्व मिळवता आले नाही. तीच गत शार्दूलची झाली होती. शार्दूलकडे अनुभव आहे, परंतु तरीही त्याचा मारा प्रभावहीन ठरला होता. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारताला भक्कम गोलंदाजांची फळी उभारण्याची गरज असल्याचे सिद्ध झाले आहे.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव असा तगडा वेगवान गोलंदाजांचा समूह पुन्हा पाहण्यास मिळणार नाही, हे निश्चित आहे. ईशांत आणि उमेश यांची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. पहिल्या कसोटीत बुमराहला शमीच्या अनुपस्थितीत अपेक्षित साथ मिळाली नाही.
अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडूनही अपेक्षाभंग झाला. त्यामुळे शमीविना गोलंदाजी करताना बुमराहची मोठी कसोटी लागली. मोहम्मद सिराज गेल्या काही काळापासून सातत्याने कसोटी खेळत असला, तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव राहिलेला आहे.
प्रसिद्ध संघाबाहेर जाणार
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ज्याप्रकारे भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आवेश खानला बोलावून घेतले, ते पाहता प्रसिद्ध कृष्णाचे संघातील स्थान जवळपास जाणार हे निश्चित आहे. एका माजी भारतीय गोलंदाजाने सांगितले की, ‘प्रसिद्धने रणजी चषक स्पर्धेचे पूर्ण सत्र कधी खेळले होते, हेच भारतीय निवडकर्ते विसरले होते. केवळ भारत ‘अ’ संघाकडून एका सामन्यात चांगली कामगिरी केली, म्हणजे त्याला कसोटी पदार्पणाची संधी देणे पुरेसे ठरत नाही. भारताच्या पुढील वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह, शमी, ईशांत आणि सिराजप्रमाणे उत्साह आणि आत्मविश्वास नाही. हीच भारताची मोठी अडचण ठरणार आहे.’
दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी फिरकीसाठी फायदेशीर?
भारताला दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी दि. ३ जानेवारीपासून केपटाऊन येथे न्यूलँड्स मैदानावर रंगणारा दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. मात्र, येथील रेकॉर्ड भारतासाठी चांगला नाही. भारताने येथे सहा कसोटी सामने खेळले असून, एकही विजय मिळवता आलेला नाही. भारताने येथे चार पराभव पत्करले असून, दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तरी, येथे रंगणारा दुसरा सामना भारतीयांसाठी संधी देणारा ठरू शकेल. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजांना मदत होणार असून, दुसरा व तिसरा दिवस फलंदाजांसाठीही फायदेशीर ठरेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल या सामन्यात महत्त्वाचा ठरणार असून, विजयी संघ प्रथम गोलंदाजीलाच प्राधान्य देईल, हे निश्चित आहे.