ICC World Test Championship 2021-23 : पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेवर ४ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेवरील कसोटी विजयानंतर पाकिस्तानने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या महिन्याच्या सुरूवातीला श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले होते, परंतु पाकिस्तानच्या विजयानंतर श्रीलंका सहाव्या क्रमांकावर घसरली आहे.
भारतीय संघालाही पाकिस्तानच्या विजयाचा फायदा झालेला पाहायला मिळाला. भारतीय संघ एक स्थान वर सरकताना चौथ्या क्रमांकावर आला आहे. ICC ने गुरुवारी याबाबतची आकडेवारी ट्विट केली. त्यामुळे आता टीम इडिया अजूनही WTC Final च्या शर्यतीत कायम आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने WTC च्या पहिल्या पर्वात अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु न्यूझीलंडने जेतेपदाचा सामना जिंकला होता.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाची घरसण झाली होती. ते तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर गेले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाने टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर गेली. पण, आता ते पुन्हा चौथ्या क्रमांकावर आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची टक्केवारी ५२.०८ अशी आहे. पाकिस्तान ( ५८.३३), दक्षिण आफ्रिका ( ७१.४३) व ऑस्ट्रेलिया ( ७० ) हे आघाडीवर आहेत. यापैकी दोन संघ WTC 2021-23 च्या फायनलसाठी पात्र ठरणार आहेत.
पाकिस्तानने आणखी एक कसोटी विजय मिळवल्यात, ते आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना मागे टाकू शकतात, पण पराभव त्यांना पाचव्या क्रमांकावर फेकू शकतो. श्रीलंकाला दुसऱी कसोटी जिंकून पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघही बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी, तर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताने या सहा कसोटी जिंकल्यास त्यांची टक्केवारी ६८.०५ इतकी होऊ शकते.