कोलंबो : फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने आठ महिन्यांमध्ये सहाव्यांदा ६००चा आकडा पार केल्यानंतर पहिल्या डावात श्रीलंकेची २ बाद ५० अशी अवस्था करीत दुस-या कसोटी सामन्यावर दुसºया दिवसअखेर वर्चस्व कायम राखले. चेतेश्वर पुजारा (१३३) व अजिंक्य रहाणे (१३२) यांच्या वैयक्तिक शतकांव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (नाबाद ७०), रिद्धिमान साहा (६७), लोकेश राहुल (५७) व रविचंद्रन अश्विन (५४) यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने ९ बाद ६२२ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
भारताने गेल्या आठ महिन्यांत सहाव्यांदा ६०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची मजल मारली. दरम्यान, भारत श्रीलंकेविरुद्ध सलग दुसºयांदा ६०० धावांचा पल्ला ओलांडणारा पहिला संघ ठरला. श्रीलंकेतर्फे रंगना हेराथने १५४ धावांच्या मोबदल्यात ४ तर पदार्पणाची कसोटी खेळणाºया मलिंदा पुष्पकुमारने १५६ धावांत २ बळी घेतले. दिमुथ करुणारत्ने व दिलरुवान परेरा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंका संघाने दिवसअखेर सलामीवीर दिमुथ करुणारत्ने (२५) व उपुल थरंगा (००) यांच्या विकेट गमावत ५० धावा केल्या होत्या. या दोघांना आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने (२-३८) तंबूचा मार्ग दाखविला. शुक्रवारी दुसºया दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी कुसाल मेंडिस (१६) व कर्णधार दिनेश चांदीमल (८) खेळपट्टीवर होते. श्रीलंकेला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ५७२ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत.
भारताच्या विशाल धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. दुसºया षटकात थरंगा बाद झाला. अश्विनच्या गोलंदाजीवर तो शॉर्टलेगला तैनात लोकेश राहुलकडे झेल देत माघारी परतला. करुणारत्ने व मेंडिस यांनी त्यावर संयमी फलंदाजी केली. जडेजाच्या गोलंदाजीवर मेंडिसविरुद्ध पायचितच्या निर्णयासाठी डीआरएसचा आधार घेण्यात आला, पण तिसºया पंचानी फलंदाजाच्या बाजूने निर्णय दिला. अश्विनने करुणारत्नेला स्लिपमध्ये रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मेंडिस व चांदीमल यांनी दिवसअखेर संघाची पडझड होऊ दिली नाही.
त्याआधी, कालच्या ३ बाद ३४४ धावसंख्येवरून खेळताना भारताने दमदार मजल मारली. श्रीलंकेला सकाळच्या सत्रात मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप स्नायूच्या दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यजमान संघाला या कसोटीत आता स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजाविना खेळावे लागणार आहे. भारताने पहिल्या सत्रात शतकवीर पुजारा व रहाणे यांच्या विकेट गमावल्या. पुजाराला कालच्या धावसंख्येत केवळ पाच धावांची भर घालता आली. कामचलावू गोलंदाज दिमुथ करुणारत्नेने (१-३१) त्याला माघारी परतवले. त्यासाठी गोलंदाजाला डीआरएसचा आधार घ्यावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये दुसºयांदा गोलंदाजी करणाºया करुणारत्नेने आपला पहिला कसोटी बळी नोंदवला. पुजाराने २३२ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व १ षटकार लगावला. त्याने रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी २१७ धावांची भागीदारी केली.
रहाणेने १०६ व्या षटकांत संघाला चारशेचा पल्ला गाठून दिला. त्याने अश्विनसोबत पाचव्या विकेटसाठी ८४ चेंडूंमध्ये अर्धशतकी भागीदारी केली. रहाणेची शतकी खेळी फिरकीपटू पुष्पकुमारने संपुष्टात आणली. पदार्पणाची कसोटी खेळणाºया पुष्पकुमारचा हा पहिला कसोटी बळी ठरला. रहाणेने २२२ चेंडूंना सामोरे जाताना १४ चौकार लगावले.
अश्विन व साहा यांनी त्यानंतर धावफलक हलता ठेवला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर अश्विनला लगेच हेराथने क्लीनबोल्ड केले. साहा व हार्दिक पंड्या (२०) यांनी सातव्या विकेटसाठी वेगाने ४५ धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज डीआरएसमध्ये सुदैवी ठरले. त्यांनी १३४ व्या षटकांत संघाला ५०० चा पल्ला गाठून दिला. पांड्या पुष्पकुमारच्या गोलंदाजीवर लाँग आॅफला झेल देत माघारी परतला, पण साहाने मात्र जबाबदारीने फलंदाजी करताना जडेजाच्या साथीने धावफलक हलता ठेवला. साहाने वैयक्तिक अर्धशतक झळकावताना चहापानाच्या विश्रांतीपूर्वी संघाला ५५० धावांचा पल्ला गाठून दिला. धनंजय डिसिल्वाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकणाºया साहाचा हेराथच्या गोलंदाजीवर अंदाज चुकला व यष्टिरक्षक निरोश्न डिकवेलाने त्याला यष्टिचित केले. त्याने १३४ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व १ षटकार लगावला. साहाने जडेजाच्या साथीने आठव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. जडेजाने याच षटकात हेराथच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार वसूल करीत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.
मोहम्मद शमी (१९ धावा, ८ चेंडू) हेराथच्या गोलंदाजीवर दोन सलग षटकार ठोकले, पण पुढच्या चेंडूवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिडविकेटला तैनात थरंगाकडे झेल देत माघारी परतला. जडेजाने परेराच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत १५६ व्या षटकात भारताला ६००चा पल्ला ओलांडून दिला.
त्यानंतर हेराथच्या षटकात तिसरा षटकार लगावला. त्यानंतरच्या षटकात कर्णधार कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. जडेजाने ८५ चेंडुत ४ चौकार व ३ षटकार लगावले. (वृत्तसंस्था)
धावफलक-
भारत पहिला डाव : शिखर धवन त्रि. गो. परेरा ३५, लोकेश राहुल धावबाद ५७, चेतेश्वर पुजारा पायचित गो. करुणारत्ने १३३ विराट कोहली झे. मॅथ्यू गो. हेरथ १३, अजिंक्य रहाणे यष्टिचित गो. पुष्पकुमार १३२, रविचंद्रन अश्विन त्रि. गो. हेरथ ५४, रिद्धिमान साहा यष्टिचित गो. हेरथ ६७, हार्दिक पांड्या झे. मॅथ्यूज गो. पुष्पकुमार २०, रवींद्र जडेजा नाबाद ७०, मोहम्मद शमी झे. थरंगा गो. हेरथ १९, उमेश यादव नाबाद ८, अवांतर १४, एकूण : १५८ षटकांत ९ बाद ६२२ वर डाव घोषित. गडी बाद क्रम : १/५६, २/१०९, ३/१३६, ४/३५०, ५/४१३, ६/४५१, ७/४९६, ८/५६८, ९/५९८.
गोलंदाजी : नुवान प्रदीप १७.४-३-६३-३, हेरथ ४२-७-१५४-४, करुणारत्ने ८-०-३१-१, परेरा ४०-३-१४७-१, पुष्पकुमार ३८.२-२१५६-२, धनंजय १२-०-५९-०.
श्रीलंका पहिला डाव : दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. अश्विन २५, उपुल थरंगा झे. राहुल गो. अश्विन ००, कुसाल मेंडिस खेळत आहे १६, दिनेश चांदीमल खेळत आहे ८, अवांतर १, एकूण : २० षटकांत २ बाद ५० धावा. गडी बाद क्रम : १/०, २/३३. गोलंदाजी : शमी ३-१-७-०, अश्विन १०-२-३८-२, जडेजा ७-४-४-०.
श्रीलंकन वेगवान गोलंदाज प्रदीप मालिकेतून ‘आऊट’
खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येला तोंड देणाºया श्रीलंकेला शुक्रवारी पुन्हा आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज नुआन प्रदीप शुक्रवारी दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या भारताच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यातून ‘आऊट’ झाला आहे.
गाले येथील पहिल्या कसोटीत सहा बळी घेणारा प्रदीप जवळपास दोन महिने मैदानाबाहेर राहू शकतो. श्रीलंकन सलामीवीर दिमुथ करुणारत्ने याने नुवान प्रदीप एक अथवा दोन महिन्यांपर्यंत खेळू शकत नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. प्रदीप खेळत नसल्यामुळे करुणारत्नेला दुसºया डावात मध्यमगती गोलंदाजाची भूमिका पार पाडावी लागेल. त्याने आज ३१ धावांत १ गडी बाद केला.
प्रदीपने पहिल्या दिवशी १७ षटके टाकली. तो स्नायूदुखीमुळे मैदान सोडून गेला होता. तो या कसोटीत गोलंदाजी करू शकणार नाही; परंतु फलंदाजी करील याला आज दुजोराही मिळाला. श्रीलंका आधीच जखमी खेळाडूंच्या समस्येला तोंड देत आहे. अष्टपैलू असेला गुणरत्ने आधीच अंगठ्याच्या फ्रॅक्चरमुळे तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झालेला आहे. कर्णधार दिनेश चांदीमलदेखील न्यूमोनियामुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता.
हा कसोटी सामना भारताने ३0४ धावांनी जिंकला होता. (वृत्तसंस्था)
Web Title: India scored two wickets, with all-rounder Ravichandran Ashwin's half-century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.