Join us  

द. आफ्रिका ‘अ’ विरुद्ध भारत ‘अ’ दुसरी लढत आजपासून; शुभमन गिलच्या कामगिरीवर नजर

अखेरच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात पुन्हा एकदा नजर युवा शभमन गिलच्या कामगिरीवर केंद्रित राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:03 AM

Open in App

म्हैसूर : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान मंगळवारपासून होणाऱ्या दुसºया व अखेरच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात पुन्हा एकदा नजर युवा शभमन गिलच्या कामगिरीवर केंद्रित राहणार आहे. भारत ‘अ’ ने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. संघाने पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ४-१ ने विजय मिळवल्यानंतर दोन अनौपचारिक कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत सात गडी राखून जिंकली आहे.भारत ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध आणखी एक सरशी साधत विजयाने आपल्या मोहिमेचा समारोप करण्यास प्रयत्नशील आहे. या लढतीत १९ वर्षीय गिलच्या कामगिरीवर नजर राहील. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून विशाखापट्टणममध्ये प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवडण्यात आले आहे.गिलने दक्षिण आफ्रिका ‘अ’विरुद्ध पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करताना ९० धावांची शानदार खेळी केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात निवड झाल्यानंतर पंजाबचा हा युवा फलंदाज राष्ट्रीय निवड समितीचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मालिकेतील दुसºया लढतीसाठी राष्ट्रीय निवड समितीने स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाºया खेळाडूंना संधी दिली आहे. या लढतीत कर्णधारपदाची जबाबदारी गिलच्या ऐवजी बंगालचा अनुभवी यष्टिरक्षक रिद्धिमान साहा सांभाळणार आहे. संघात सलामीवीर फलंदाज म्हणून प्रियांक पांचाल व अभिमन्यू ईश्वरन यांना संधी मिळाली आहे. पांचाल व ईश्वरन यांची कामगिरी उल्लेखनीय असून, हे दोघेही राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर वेस्ट इंडिज दौºयासाठी निवड झालेल्या साहा याला रिषभ पंतच्या उपस्थितीत ड्रेसिंग रुममध्ये बसावे लागले होते. भारतीय खेळपट्ट्यांवर पंतच्या यष्टिरक्षण कौशल्याची चाचणी झालेली नाही. त्यामुळे साहा चमकदार कामगिरी करीत त्याला आव्हान देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेनंतर संघाबाहेर असलेल्या करुण नायरसाठी दुलिप ट्रॉफी स्पर्धा चांगली ठरली होती. तो पुन्हा एकदा मोठी खेळी करीत राष्ट्रीय संघासाठी आपला दावा मजबूत करू शकतो.अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या लढतीतून बाहेर असलेला तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरला या लढतीत संधी मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. शाहबाज नदीम, जलज सक्सेना व कृष्णप्पा गौतम या फिरकी त्रिकुटाने तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. अंतिम ११ मध्ये संधी मिळाली तर हे तिन्ही खेळाडू पुन्हा एकदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असतील. पहिल्या लढतीत वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज यांनी प्रभावित केले होते.या लढतीसाठी उमेश यादव, कुलदीप यादव व आवेश खान यांचा भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. अशास्थितीत अंतिम ११ खेळाडूंत कुणाला संधी मिळते, याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या लढतीतील पराभवानंतर एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघ दुसºया लढतीत पुनरागमन करण्यास प्रयत्नशील असेल. मार्कराम व्यतिरिक्त टीडे ब्रुइन, जुबेर हमजा, हेनरिक क्लासेन, सेनुरान मुथुस्वामी, डेन पीट व लुंगी एनगिडी या खेळाडूंचा भारताविरुद्ध खेळल्या जाणाºया कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या संघातही समावेश आहे.

प्रतिस्पर्धी संघभारत ‘अ’ :- रिद्धिमान साहा (कर्णधार व यष्टिरक्षक), प्रियांक पांचाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंग, करुण नायर, के गौतम, जलज सक्सेना, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, विजय शंकर, शिवम दुबे, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.दक्षिण आफ्रका ‘अ’ :- एडेन मार्कराम (कर्णधार) टीडे ब्रूइन, जुबेर हमजा, लुंगी एंगिडी, जार्ज लिंडे, पीटर मलान, एडी मूरे, सेनुरान मुथुस्वामी, मार्को जान्सेन, डेन पीट, वियान मूल्डर, हेनरिक क्लासेन, लुथो सिपाम्ला, खाया जोंडो.

 

टॅग्स :शुभमन गिल