भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी वन डे मालिकेत मुकाबला करणार आहे. पण, या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे टीम इंडिया डे-नाईट कसोटी सामना खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी रविवारी दिली. महिनाभरापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं खेळाडू ऑस्ट्रेलियात दिवस रात्र कसोटी खेळण्यासाठी तयार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया डे-नाईट कसोटी खेळेल,असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.
भारतीय संघानं नोव्हेंबर 2019मध्ये कोलकाता येथील इडन गार्डनवर पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला होता. त्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात डे नाईट कसोटीचं आव्हान दिलं होतं. पेन म्हणाला होता की, " ऑस्ट्रेलियामध्ये गावस्कर-बोर्डर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेनपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेत भारताने एक दिवस रात्र कसोटी सामना खेळावा, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत."
त्यावर कोहलीनंही हे आव्हान स्वीकारून गॅबा, पर्थ, अगदी कुठेही डे नाईट खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियानं 2018-19च्या दौऱ्यात भारताला डे नाईट कसोटीचा प्रस्ताव दिला होता, परंतु पुरेसा अनुभव नसल्यानं टीम इंडियानं तो अमान्य केला.
भारतीय संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नोव्हेंबर 2020मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2021मध्ये इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर योणार आहे. या दोन्ही मालिकेत टीम इंडिया डे नाईट कसोटी खेळणार आहे.