मुंबई : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने भारतावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी बीसीसीआयबरोबर पंगा घेतला होता. पण बीसीसीआयने आता पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावली आहे. बीसीसीआयने पाकिस्तानला मोठा धक्का दिला असून आता पाकिस्तान नेमके काय करणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.
पाकिस्तानबरोबर आम्ही द्विदेशीय सामना खेळणार नाही, हे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही खेळायला जाणार नाही, हेदेखील ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे कोणतीही मोठी स्पर्धा पाकिस्तानमध्ये घ्यायला आयसीसी धजावत नाही. आता तर बांगलादेशमध्येही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. त्यामुळे बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने एशिया इलेवन आणि वर्ल्ड इलेवन यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. पण भारताने या सामन्यासाठी एक अट टाकली आहे. ही अट जर मान्य केली तर पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.
यावेळी एशिया इलेवन हा संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये आशियातील सर्वोत्तम संघांची निवड करण्यात येणार आहे. पण या आशियातील संघात पाकिस्तानचा एकही खेळाडू नसावा, अशी अट बीसीसीआयने ठेवली आहे. जर या संघात पाकिस्तानचा खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही, अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.