अयाझ मेमन -
पहिल्या कसोटीत दारुण पराभवानंतरही भारताने ‘दम’ दाखवून विजयासह मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत मालिका इतकी रंगतदार होत आहे. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली, पण नैतिक विजय झाला तो भारताचाच. पुजारा, पंत, विहारी, अश्विन या सर्वांनी अखेरच्या दिवशी फलंदाजीत दाखविलेला निर्धार क्रिकेटविश्वाने अनुभवला. चौथा सामना सुरू होण्याआधी जखमी खेळाडूंच्या चिंतेने ग्रासले होते, पण, ऑस्ट्रेलियाला नवख्या आणि अनुभवहीन गोलंदाजांनी आपल्या दडपणाखाली आणले.
कोहली पितृत्व रजेवर, शमी आणि राहुल आधीच मायदेशी परतले, अश्विन, बुमराह, विहारी, जडेजा, उमेश हे सर्व जण बाहेर असताना अंतिम एकादश निवडून ऑस्ट्रेलियाला आव्हान देणे सोपे नव्हते. कोहलीच्या अनुपस्थितीत फलंदाजीची धुरा कोण सांभाळेल, याची चिंता होती, पण, बचावाऐवजी आक्रमकतेवर भर देण्याची रणनीती फळाला आली. जे खेळाडू उपलब्ध होते, त्यातून सर्वेात्कृष्ट एकादशची निवड करीत भारताने आव्हान उभे केले.
गाबावरील सामन्यांचा इतिहास पाहिल्यास, वेगवान गोलंदाज येथे यशस्वी ठरल्याचे नजरेस पडते. हेच ध्यानात घेत ठाकूर, नटराजन, सिराज यांना स्थान मिळाले. अश्विनची फिरकीतील उणिव वॉशिंग्टन सुंदर याने दूर केली. ब्रिस्बेन मैदानावरील कामगिरीतून विसंबून राहण्याऐवजी स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या कामगिरीचे दर्शन घडले. या मैदानावर दोन दिवसांची कामगिरी प्रशंसनीय अशीच म्हणावी लागेल. गोलंदाजांनी दडपण झुगारून लावले. कौशल्य पणाला लावून त्यांनी यजमानांना ३६९ असे रोखले. या धावा कमी नाहीत. टिम पेन आणि सहकाऱ्यांनी मात्र ४५० धावांचे जे स्वप्न पाहिले असेल, त्या तुलनेत कमी आहेत.
रोहित शर्माचा वैयक्तिक ४४ धावा केल्यानंतर लियोनविरुद्ध पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न फसला नसता तर भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत बरोबरीने सुरुवात केली असती. रोहित बाद झाल्यामुळे सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया संघ वरचढ भासत आहे. पुजारा व रहाणे खेळपट्टीवर असून पंत, अग्रवाल आणि सुंदर यांच्या रूपाने भारताची फलंदाजी भक्कम आहे. भारताने अधिक विकेट न गमावता तिसऱ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढले तर या कसोटीचीही वाटचाल रंगतदार स्थितीकडे राहील.
एकूण विचार करता या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होणे इशारा देणारे वृत्त आहे. त्यामुळे संघाच्या वाटचालीला धक्का बसला आहे. पहिल्या कसोटीनंतर कोहलीची अनुपस्थिती आणि पहिल्या दोन कसोटींसाठी रोहित उपलब्ध नसल्यामुळे संघाला फटका बसला आहे. त्यात शमी व जडेजा फ्रॅक्चर झाले, पण अन्य खेळाडूंचे काय?
उमेश व विहारी यांना स्नायूची दुखापत तर बुमराहच्या पोटाच्या स्नायू ताणल्या गेले. अश्विन पाठदुखीमुळे त्रस्त आहे आणि ब्रिस्बेनमध्ये पहिल्याच दिवशी सैनी लंगडत मैदानाबाहेर पडला. त्याचा घोटा दुखावल्याचे वृत्त असल्यामुळे तो या लढतीत पुढे सहभागी होण्याची शक्यता नाही. त्याआधी, ईशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार या दोन गोलंदाजांना आयपीएलदरम्यान अशाच प्रकारची दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी होता आले नाही. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त का होत आहेत, हा विचार करण्याचा मुद्दा आहे.
हे सर्वकाही अधिक कार्यभार, अधिक सराव किंवा खेळाडू स्वत:च्या फिटनेसबाबत जागरूक नसल्यामुळे घडत असावे का ? की छोट्या दुखापतींवर खेळाडूंना वेळीच योग्य उपचार मिळत नाही का? ही मोठी समस्या आहे किंवा अन्य कुठले कारण आहे. बीसीसीआयतर्फे या परिस्थितीची चौकशी होणे आवश्यक आहे. बीसीसीआयने तज्ज्ञांची समिती स्थापन करीत याबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे. या समस्येचे दूरगामी परिणाम होणार असले तरी सध्या ऑस्ट्रेलियात खेळाडूंच्या कामगिरीला कमी लेखता येणार नाही.
Web Title: India should find out why the players were injured
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.