Team India Batting, IND vs ENG 5th Test: एजबॅस्टनमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या आणि सामन्यावर मजबूत पकड मिळवली. यानंतर इंग्लंडचा संघ २८४ धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताने १३२ धावांची आघाडी घेतल्याने भारतीय संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. पण दुसऱ्या डावात भारतीय संघ २४५ धावांत बाद झाला आणि इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यावेळीही टीम इंडिया मजबूत स्थितीत असल्याचे मानले जात होते, मात्र इंग्लिश फलंदाजांनी बाजी फिरवली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३ बाद २५९ धावा केल्या. आता पाचव्या दिवशी इंग्लंडला ११९ धावांची गरज आहे. या साऱ्या प्रकारानंतर भारताचे फलंदाजी कोच विक्रम राठोड यांनी भारतीय फलंदाजांवर जाहीर नाराजी व्यक्त केली.
चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत विक्रम राठोड म्हणाले, "फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आमचा दिवस अतिसामान्य गेला. आम्ही सुरुवातीपासूनच खेळात पुढे होते. एक वेळ अशी होती की सामना आम्ही जवळपास फिरवला होता. आम्ही अशा स्थितीत होतो जिथून आम्ही इंग्लंडला खेळातून बाहेर फेकू शकत होतो पण आता मात्र दुर्दैवाने अशी स्थिती राहिली नाही. अनेक खेळाडूंनी चांगली सुरुवात केली, पण ते त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाहीत. त्यांच्यापैकी एकाने मोठी खेळी किंवा काही भागीदारी व्हावी अशी आम्हाला अपेक्षा होती, पण तसे झालं नाही."
"भारतीय संघाचा विजय आता गोलंदाजांवर अवलंबून आहे. आता आपल्याला गोलंदाजीत उत्तम लाईन-लेन्थने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी मध्ये आपल्या काही महत्त्वाच्या संधी हुकल्या. पण त्यामुळेच आता सामना खूप रोमांचक झाला आहे. आता भारतीय गोलंदाजांनी कमाल केली तर भारताला मालिकेतील आघाडी टिकवून ठेवता येईल आणि नवा पराक्रम रचता येईल", असेही विक्रम राठोड म्हणाले.
दरम्यान, पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात चांगली झुंज देता आली नाही. म्हणूनच टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड खराब फलंदाजीबद्दल संतापले आणि त्यांनी खेळाडूंवरही संताप व्यक्त केला. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर पहिल्या डावातील शतकवीर ऋषभ पंतनेही ५७ धावा केल्या. पण याशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.