Join us  

देश महत्त्वाचा की क्रिकेट ? पाकविरुद्ध सामन्यावर बहिष्कार घाला, हरभजन सिंग

पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 9:02 AM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यानेही पाकविरुद्ध खेळू नका अशी मागणी केली आहे. देश महत्त्वाचा आहे, क्रिकेट नंतर, असे मत भज्जीनं व्यक्त केलं आहे.  

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी करणारा भज्जी हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पाकविरुद्ध न खेळूनही पुढील फेरीत प्रवेश करण्याची क्षमता राखतो, असेही भज्जी म्हणाला. ''भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. पाकविरुद्ध न खेळूनही भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो,'' असे ठाम मत भज्जीनं व्यक्त केलं.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीत संतापाची लाट उसळली. तो पुढे म्हणाला,''हा क्षण आव्हानात्मक आहे. असा हल्ला होणे ही दुःखद घटना आहे आणि हे अत्यंत चुकीचे आहे. केंद्र सरकार हल्ल्याच्या कटात सामील असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करेल. पण, जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा मला असे वाटते की आपण त्यांच्याशी क्रिकेटचे संबंधही तोडून टाकावेत. नाहीतर ते आपल्याला गृहीत धरतील.'' 

''भारताने वर्ल्ड कपमध्येही पाकविरुद्ध खेळू नये. देशाला प्राधान्य द्या आणि आपल्या जवानांच्या पाठिशी उभे राहा. क्रिकेटच नव्हे, तर हॉकी किंवा अन्य खेळांतही हे संबंध तोडले पाहिजेत. असे केले नाही, तर त्यांच्या दहशतवादी कुरापती थांबणार नाहीत. आपल्याला देशवासीयांसोबत उभे राहायला हवे,'' असेही भज्जी म्हणाला. 

पण, दोन्ही संघांनी वर्ल्ड कप स्पर्धेत आगेकूच केली आणि उपांत्य किंवा अंतिम फेरीत पुन्हा समोरासमोर आले, तर त्याबाबत मंत्रालयाने निर्णय घ्यावा, असेही भज्जी म्हणाला. त्याने सांगितले की,''या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बरीच अनुभवी मंडळी आहेत. आपण त्यांच्या तुलनेत खुप लहान आहोत. उपांत्य किंवा अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना करावा लागला तर? हा प्रश्न सोडवण्यासाठी बराच वेळ आहे. सत्ताधारी त्याचा निर्णय घेतील.''

टॅग्स :हरभजन सिंगआयसीसी विश्वकप २०१९पुलवामा दहशतवादी हल्ला