भारताचे परराष्ट्रमंत्री नुकतेच पाकिस्तानात एका परिषदेसाठी गेले होते. यावेळी पाकिस्तानी मंत्र्यांनी जयशंकर यांना भारतीय संघाने पाकिस्तानात चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळण्यासाठी यावे यासाठी कळकळीची विनंती केली होती. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास जावे की नाही हा निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. यामुळे स्टेडिअमवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या पाकिस्तानला तो खर्च भरून काढण्यासाठी काहीही करून भारतीय संघ पाकिस्तानात हवा आहे. यासाठी आता नवा प्रस्ताव पाकिस्तानने दिल्याचे समजते आहे.
भारतीय संघाने क्रिकेट सामना पाकिस्तानात खेळण्यासाठी यावे आणि सामना संपल्यावर पुन्हा भारतात चंदीगढ किंवा दिल्लीत राहण्यासाठी जावे, असा प्रस्ताव पाकिस्तानने दिला आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. याबाबत बीसीसीआय किंवा आयसीसीने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
पाकिस्तानात चॅम्पिअन्स ट्रॉफी होणार आहे. जयशंकर आणि पाकिस्तानी समकक्ष इशाक डार यांच्यात भारताने पाकिस्तानात खेळायला यावे, यावर चर्चा झाली. यावेळी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी देखील होते असे सांगितले जात आहे. आधीच पैशांची अडचण असलेली पीसीबी भारत काहीही करून पाकिस्तानला येणार म्हणून स्टेडिअमवर करोडो रुपये खर्च करून बसली आहे. भारत आला नाही तर पाकिस्तानचा कर्मचाऱ्यांचा खर्चही निघणार नाहीय. यामुळे गेल्या काही वर्षांपासून पीसीबी भारताच्या नावाने खडे फोडत आहे.
पीसीबीने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात राहण्यास तयार नाहीय तर प्रत्येक मॅचनंतर ते चंदीगढ किंवा दिल्लीला परतू शकतात, असे म्हटले आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्यानुसार दोन मॅचमध्ये जवळपास एक आठवड्याचे अंतर आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च याकाळात होणार आहे. याचे सामने लाहोर, रावळपिंडी आणि कराचीमध्ये होतील. भारताच्या जवळ असल्याने लाहोरला निवडण्यात आले आहे. भारतीय संघासोबतच भारतीय चाहत्यांना हे ठिकाण सोईचे असेल.
भारताच्या तीन मॅच आहेत ज्या २० फेब्रुवारीला बांग्लादेश, २३ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि २ मार्चला न्युझीलंडविरोधात आहेत. यापैकी न्यूझीलंडविरोधातील मॅच दुसऱ्या ठिकाणी घेण्याची विनंती आली आहे. पाकिस्तानने यासाठी रावळपिंडीचा पर्याय दिला आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारत सहभागी झाला नाही तर ही स्पर्धा अत्यंत निरस होणार आहे. याची आयसीसी आणि पीसीबीलाही कल्पना आहे. पाकिस्तानला आपला खर्च भरून काढण्यासाठी भारत पाकिस्तानातच हवा आहे. जे सध्याच्या भारताच्या भुमिकेमुळे शक्य नाहीय. भारताने पाकिस्तानात शेवटचा सामना २००७ मध्ये खेळलेला आहे.
Web Title: India should play in Pakistan, after match they should go to India to stay; Disturbed Neighbor's New Formula for Champions Trophy 2025 Again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.