नवी दिल्ली : ‘महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी शानदार होते, मात्र मोक्याच्या वेळी अपयश पत्करावे लागते. आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाला मुंबई इंडियन्सप्रमाणे खेळावे लागेल,’ असा सल्ला भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने दिला.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आपली छाप पाडली. भारताला २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला होता. रोहितने ‘डबल ट्रबल’ कार्यक्रमामध्ये आपले मत मांडताना म्हटले की, ‘भारतीय संघाला आयसीसीच्या मुख्य स्पर्धांमध्ये मुंबई इंडियन्स संघाप्रमाणे खेळावे लागेल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ सुरुवातीला काही सामने गमावतो; मात्र अखेरपर्यंत टिकून राहतो.’ या कार्यक्रमामध्ये रोहितसह भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि जेमीमा रॉड्रिग्ज यांचाही सहभाग होता.
रोहित शर्मा याने सांगितले की, ‘आम्ही २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालो. संपूर्ण स्पर्धेत आम्ही अपराजित राहिलो होतो. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेतही असेच झाले. जवळपास अपराजित राहिल्यानंतर आम्ही उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झालो. त्यामुळे ज्याप्रकारे मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये खळतो, त्याप्रमाणेच भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळावे लागेल. आम्ही आयपीएलमध्ये सुरुवातीला काही सामने गमावतो खरे; मात्र शेवटी चषक पटकावण्यात यशस्वीही ठरतो आणि हेच महत्त्वाचे ठरते.’
Web Title: India should play like Mumbai Indians - Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.