भारताला विश्वचषक जिंकून देणारा टीम इंडियाचा दुसरा कर्णधार आणि माजी धडाकेबाज फलंदाज म्हणजे महेंद्रसिंह धोनी. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून सध्या दिवाळी एन्जॉय करत आहे. एकीकडे वर्ल्डकपचा थरार रंगला असून दुसरीकडे माही पत्नीसमवेत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. भाऊबीज दिनी धोनीने पत्नीसह वडिलांच्या मूळ गावाला भेट दिली. यावेळी, आपल्या बालपणीच्या आठवणी जागवत तेथील मित्रांच्या गाठीभेटीही घेतल्या. धोनीच्या या गावभेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
धोनीने तब्बल २० वर्षांनंतर वडिलांचे मूळ गाव असलेल्या ल्वाली येथे भेट दिली. यावेळी, ग्रामस्थांची आपुलकीने चौकशी करत अनेकांच्या गाठीभेटीही घेतल्या. यावेळी, गावचं ग्रामदैवत असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच, यंदाचा वर्ल्डकप भारतानेच जिंकावा, यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली. यावेळी, माहीसमवेत त्याची पत्नी साक्षी आणि माहीची गावातील जुने मित्रही उपस्थित होते.
धोनीने गावातील तरुणांना क्रिकेटच्या टीप्सही दिल्या. गावातील वृद्ध आणि महिला भगिनींसोबतही फोटो काढले. यावेळी, माही आणि साक्षीला पाहायला गावकऱ्यांनी गर्दी केली होती. तसेच, त्यांसोबत फोटो काढण्यासाठीही सर्वांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं. अल्मोडा जिल्ह्यातील जैती तालुक्यातील ल्वाली हे धोनीचे पितृक गाव आहे. गावातील गंगानाथ मंदिर, गोलू देवता, देवी माता आणि नरसिंह मंदिरातही धोनीने पूजा-आरती करुन देवांला साकडे घातले.
धोनीचे मूळ गाव ल्वाली हे आजही डांबरी रस्त्यापासून दूर आहे. त्यामुळे, चायखान-बचकांडे इथपर्यंत कारने प्रवास करत माही व साक्षी पोहोचले. गावी जाण्यासाठी १ किमीपर्यंत चालत जावे लागत असल्याने माहीने मुलगी जिवा हिस गावी आणले नाही. तर, जिवा थोडी मोठी झाल्यानंतर आणखी ३-४ वर्षांनी पुन्हा एकदा आपण गावी येऊ, असे धोनीने म्हटले आहे.