नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशवासियांशी "मन की बात" (Mann Ki Baat) मधून संवाद साधला. मोदींनी देशातील मुलींचं भरभरून कौतुक केलं आहे. आमच्या मुली आज प्रत्येक ठिकाणी आपली ओळख निर्माण करत आहेत. खेळाप्रती त्यांच्यामध्ये आवड निर्माण होत आहे असं म्हटलं आहे. क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या महिला खेळाडूचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) हिच्या कामगिरीबद्दल भरभरून कौतुक केलं आहे.
"मिताली राज यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटर बनल्या आहेत. यासाठी त्यांचे खूप-खूप अभिनंदन" असं मोदींनी मन की बातमध्ये म्हटलं आहे. यानंतर आता मिताली राज हिने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "माझ्या कारकीर्दीत मी केलेल्या विक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली प्रशंसा ही माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे" असं मिताली राजने म्हटलं आहे.
दोन सामने, दोन वर्ल्ड रेकॉर्ड; कॅप्टन मिताली राजनं उंचावली भारतीयांची मान!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( India Women Vs South Africa Women) यांच्यातल्या चौथ्या वन डे सामन्यात टीम इंडियाची कर्णधार मिताली राज ( Mithali Raj) हिने आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तिसऱ्या वन डे सामन्यात मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान पटकावला होता. त्यानंतर तिनं चौथ्या वन डे सामन्यातही आणखी एक विक्रम नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारी ती जगातली पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
नरेंद्र मोदींनी कोरोना लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूच्या काही आठवणींना उजाळा दिला. "गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण ठरला" असं मोदींनी म्हटलं आहे. "शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल. तसेच कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे हे सर्व कोरोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. गेल्या वर्षी कोरोना लस कधी येणार? हा सर्वांना प्रश्न पडला होता. पण आता आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.