धर्मशाला : सुरंगा लकमलच्या भेदक माºयानंतर सलामीवीर उपुल थरंगाच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने एकतर्फी ठरलेल्या पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी यजमान भारताचा ७ गडी राखून पराभव केला आणि सलग १२ सामन्यांतील पराभवाचे दुष्टचक्र भेदत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.भारताने दिलेल्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने थरंगाच्या (४९) खेळीच्या जोरावर १७६ चेंडू शिल्लक राखत विजय साकारला. अँजेलो मॅथ्यूज (नाबाद २५) व निरोशन डिकवेला (नाबाद २६) यांनी चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला लक्ष्य गाठून दिले.लकमल (४-१३) व नुवान प्रदीप (२-३७) यांच्या अचूक माºयापुढे भारतीय संघ महेंद्रसिंह धोनीच्या (६५) अर्धशतकी खेळीनंतरही ३८.३ षटकांत ११२ धावांत गारद झाला. धोनीव्यतिरिक्त कुलदीप यादव (१९) व हार्दिक पांड्या (१०) यांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली.या पराभवासह भारताने सध्या सुरू असलेल्या मालिकेदरम्यान जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी गमावली. आज विजय मिळवला असता तर दक्षिण आफ्रिकेला पिछाडीवर सोडत भारताने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असते. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. १३) मोहालीत खेळला जाणार आहे.लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. धावफलकावर ७ धावांची नोंद असताना गुणतिलकाला (१) बुमराहने माघारी परतवले. बुमराहने त्यानंतर दुसरा सलामीवीर थरंगा यालाही गलीमध्ये दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले, पण तोनोबॉल होता. थरंगा त्या वेळी वैयक्तिक ११ धावांवर होता.भुवनेश्वर कुमारने त्यानंतरच्या षटकात (१-४२) लाहिरू थिरिमानेला (०) क्लीन बोल्ड करीत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. थरंगाला (४९) पांड्याने माघारी परतवले, पण तोपर्यंत त्याने श्रीलंकेच्या विजयाची पायाभरणी केली होती. मॅथ्यूज व डिकवेला यांनी संघाला लक्ष्य गाठून दिले.त्याआधी, धोनीच्या ८७ चेंडूंतील ६५ धावांच्या खेळीनंतरही भारतीय संघाचा डाव ११२ धावांत संपुष्टात आला. नाणेफेक गमाविल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल स्थितीत लकमल, प्रदीप व मॅथ्यूज यांच्या आक्रमणाचे उत्तर नव्हते. भारताची ५ बाद १६ अशी अवस्था झाली होती, पण त्यानंतर धोनीच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाला शतकाची वेस ओलांडता आली. (वृत्तसंस्था)
चेंडू शिल्लक राहून झालेल्या पराभवाचा विचार करता भारताचा मायदेशातील हा सर्वांत मोठा पराभव ठरला. यापूर्वी आॅस्ट्रेलियाने २००७मध्ये बडोदामध्ये १४५ चेंडू शिल्लक राखून पराभव केला होता तर श्रीलंकेने आॅगस्ट २०१० मध्ये दाम्बुला येथे टीम इंडियाला २०९ व हंबनटोटामध्ये जुलै २०१२ मध्ये १८१ चेंडू राखून हरविले होते.
आम्हाला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. आम्ही आणखी ७०-८० धावा केल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती. अशा स्थितीमध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. हा पराभव आम्हाला इशारा देण्यास पुरेसा आहे.- रोहित शर्मा, कर्णधार, भारत
विजयाचे सर्व श्रेय गोलंदाजांना जाते. त्यांनी आमच्यासाठी विजयाची पायाभरणी केली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. आम्हाला अशा खेळपट्टीची अपेक्षा नव्हती, पण गोलंदाजीला सुरुवात केली त्या वेळी खेळपट्टीची कल्पना आली.- थिसारा परेरा, कर्णधार, श्रीलंका
धावफलक
भारत :- रोहित शर्मा झे. डिकवेला गो. लकमल ०२, शिखर धवन पायचित गो. मॅथ्यूज ००, श्रेयस अय्यर त्रि. गो. प्रदीप ०९, दिनेश कार्तिक पायचित गो. लकमल ००, मनीष पांडे झे. मॅथ्यूज गो. लकमल ०२, महेंद्रसिंह धोनी झे. गुणतिलका गो. परेरा ६५, हार्दिक पांड्या झे. मॅथ्यूज गो. प्रदीप १०, भुवनेश्वर कुमार झे. डिकवेला गो. लकमल ००, कुलदीप यादव यष्टिचित डिकवेला गो. धनंजय १९, जसप्रीत बुमराह त्रि. गो. पाथिराना ००, यजुवेंद्र चहल नाबाद ००. अवांतर (५). एकूण : ३८.२ षटकांत सर्व बाद ११२. गोलंदाजी : लकमल १०-४-१३-४, मॅथ्यूज ५-२-८-१, प्रदीप १०-४-३७-२, परेरा ४.२-०-२९-१, धनंजय ५-२-७-१, पथिराना ४-१-१६-१.श्रीलंका :- दनुष्का गुणतिलका झे. धोनी गो. बुमराह ०१, उपुल थरंगा झे. धवन गो. पांड्या ४९, लाहिरू थिरिमाने त्रि. गो. भुवनेश्वर ००, अँजेलो मॅथ्यूज नाबाद २५, निरोशन डिकवेला नाबाद २६. अवांतर (१३). एकूण : २०.४ षटकांत ३ बाद ११४. गोलंदाजी : भुवनेश्वर ८.४-१-४२-१, बुमराह ७-१-३२-१, पांड्या ५-०-३९-१.