नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ काही दिवसांमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळणार आहे. पण या कसोटी मालिकेमध्ये बीसीसीआयने मोठा बदल केल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआय आणि काही राज्य संघटनांची आज एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत बदल पाहायला मिळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना 10 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये रांची येथे होणार होता. त्यानंतर तिसरा सामना 19-23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पुणे येथे होणार होता. पण झारखंड क्रिकेट संघटनेने दुसऱ्या सामन्याबाबत काही बदल बीसीसीआयला सुचवले होते. बीसीसीआयने हे बदल मान्य केले आहेत. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत बदल केले आहेत.
आपच्याकडे दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे 10 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सामना खेळवणे आम्हाला जमणार नाही, अशी विनंती झारखंड क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला केली होती. बीसीसीआयने ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत दुसरा सामना आता पुण्यात होणार आहे आणि तिसरा सामना रांची येथे होणार आहे.