भारतीय ऑफस्पिनर आर अश्विन इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकत ICC कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे . अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत सहा विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच जोरावर त्याने अव्वल स्थान पटकावले. आता त्याला मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये आघाडी वाढवण्याची संधी आहे.
४० वर्षीय अँडरसनने २२ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला अव्वल स्थानावरून बाहेर काढले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सात बळी घेणारा अँडरसन १९३६ नंतरचा नंबर वन कसोटी गोलंदाज ठरणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला . मात्र, दुसऱ्या कसोटीत केवळ तीन विकेट्स घेतल्याने त्याला अव्वल स्थान कायम राखता आले नाही.
भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी यांनीही प्रत्येकी एक स्थानाची प्रगती करत अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी गेल्या वर्षी जुलैपासून एकही कसोटी खेळलेली नाही. खरं तर, इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन दोन स्थानांनी खाली घसरला असून बुमराह आणि शाहीनला याचा फायदा झाला आहे. दिल्ली कसोटीत 10 बळी घेऊन सामनावीर ठरलेला रवींद्र जडेजा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या तर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"