Suryakumar Yadav Hardik Pandya, Team India IND vs SL T20 ODI Series: भारताचा संघ २७ जुलैपासून श्रीलंकेत टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासाठी ही पहिली परीक्षा असणार आहे. भारताचा संघ श्रीलंकेत ३ टी२० सामने खेळणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिकाही रंगणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज दोनही संघ जाहीर केले. यात महत्त्वाची बाब म्हणजे सूर्यकुमार यादव याला टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार होण्यासाठी वाट पाहावी लागणार हे नक्की असले तरी त्याचे उपकर्णधारपदही गेले असून त्याच्या जागी युवा खेळाडूला ही संधी देण्यात आली आहे.
हार्दिक पांड्याचा 'गेम' झाला?
भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही टी२० मधून निवृत्ती घेतली. रोहित जेव्हा संघाचा कर्णधार होता तेव्हा हार्दिककडे उपकर्णधार पद होते. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीनंतर हार्दिकच कर्णधार होईल, अशी शक्यता होती. पण काही दिवसांपासून सूर्यकुमारचे नाव चर्चेत होते. रोहित शर्मा कर्णधारपदासाठी सूर्याचे नाव सुचवून गेला असेही सांगण्यात येत होते. त्यानुसार, आज बीसीसीआयने संघ जाहीर केला आणि हार्दिकच्या चाहत्यांना डबल धक्का बसला. हार्दिकला कर्णधारपद मिळाले नाहीच, पण त्याचे उपकर्णधारपदही गेले. त्याच्या जागी शुबमन गिलकडे ही जबाबदारी देण्यात आली.
पाहा भारताचे दोनही संघ-
टी२० संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिका २७ जुलैपासून सुरू होणार आहे, तर वन-डे मालिका २ ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. टी२० मालिका पल्लेकल येथे खेळवली जाईल, तर वन डे मालिकेतील तीनही सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली परीक्षा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -
पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक -
पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.