मुंबई : मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे भारत अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) सोमवारी दोन संघ जाहीर केले. 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत पांडे, तर अखेरच्या दोन सामन्यांत भारत अ संघाचे नेतृत्व अय्यर सांभाळणार आहे. या मालिकेतून विजय शंकर संघात पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतीमुळे विजय शंकरला स्पर्धा अर्ध्यावर सोडून माघारी परतावे लागले होते.
तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या या मालिकेत भारत अ संघात शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुईस शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल आणि नितीश राणा यांचाही समावेश आहे. पांडेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात यष्टिरक्षक म्हणून इशान किशनला, तर अय्यरच्या संघात संजू सॅमसनला निवडण्यात आले आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी फिरकीपटू युजवेंद्र चहलही भारत अ संघाचा सदस्य असणार आहे. 29 आणि 31 ऑगस्ट, 2, 4 व 8 सप्टेंबर असे हे सामने होतील. या सामन्यांवर निवड समितीची नजर असणार आहे.
भारत अ
- पहिल्या तीन वन डेसाठी संघ - मनिष पांडे ( कर्णधार), रुतूराज गायकवाड, शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, इशान किशन, विजय शंकर, शिवम दुबे, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, खलील अहमद, नितीश राणा.
- अखेरच्या दोन वन डेसाठी संघ - श्रेयस अय्यर ( कर्णधार, शुबमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, संजू सॅमसन, नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, इशार पोरेल.