भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातून हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना ६ ऑक्टोबरला ग्वाल्हेरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी सामना दिल्ली आणि हैदराबादच्या मैदानात रंगणार आहे. या मालिकेसाठी आठवड्याभरात भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन पहिली पसंती; इशान किशन वेटिंगवर
पीटीआयच्या वृत्तानुसार, बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसन हा विकेट किपर बॅटरच्या रुपात टीम इंडियाची पहिली पसंती असेल. टी-२० संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या जितेश शर्मा आणि इशान किशनला त्याने मागे टाकले आहे. इराणी चषक स्पर्धेत त्यामुळंच संजू सॅमसनच्या नावाचा समावेश केला गेला नाही, हेच यातून स्पष्ट होते. दुलिप करंडक स्पर्धेत शतकी खेळीनंतरही इशान किशनला टीम इंडियात कमबॅकसाठी प्रतिक्षा करावी लागण्याचे संकेत मिळतात. कारण तो इराणी चषक स्पर्धेत शेष भारत संघाचा भाग आहे. ही स्पर्धा १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेपासून या मंडळींना विश्रांती
सध्याच्या घडीला बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाचा भाग असणाऱ्या शुबमन गिल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या मंडळींना टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात येणार आहे. ही मंडळी न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यातून पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
झिम्बाब्वे दौऱ्यावरील चेहऱ्यांना पुन्हा संधी, अभिषेक करेल डावाची सुरुवात
बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जुलैमध्ये पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यात दिसलेले चेहरेच पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत अभिषेक शर्मा हा भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळू शकते. जर यशस्वी जैस्वाललाही विश्रांती देण्यात आली तर संजू सॅमसन हा सलामीच्या रुपातही एक पर्याय ठरू शकतो.
ऋतुराज गायकवाडचं काय?
इराणी चषक स्पर्धेत शेष भारत संघाचं नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाड हा पहिल्या टी-२० सामन्यात दिसणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. पण उर्वरित दोन सामन्यात त्याची संघात वर्णी लागू शकते. इराणी चषक स्पर्धेतील सामन्यानंतर तो अखेरच्या दोन टी-२० सामन्यात खेळताना दिसू शकतो. यावेळी इशान किशनलाही संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.