India squad for SA: न्यूझीलंड मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होण्याचा अंदाज आहे. न्युझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानं संघ निवडताना आमची डोकेदुखी वाढलीय, पण ही चांगली गोष्ट आहे, असे विधान केले होते. त्यातच त्यानं युवा खेळाडूंची बाजू घेताना काही सीनियर्स खेळाडूंशी संवाद साधण्याची गरज असल्याचं संकेतही दिले. पण, त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) खराब फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) पाठराखण केली होती. त्यामुळे आफ्रिका दौऱ्यावर रहाणेची निवड होते की नाही, हे पाहण्यास सर्वच उत्सुक आहेत.
आजचा दिवस हा अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीची पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. यावेळी त्याचे केवळ कसोटी उप कर्णधारपदच नव्हे तर संघातील जागाही पणाला लागली आहे. हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, शुबमन गिल व मयांक अग्रवाल हे खेळाडू त्याच्या जागी संघात फिट बसतील असे अनेकांचे मत आहे आणि या खेळाडूंनी खेळातून ते सिद्धही केले आहे. बरोबर एक वर्षापूर्वी अजिंक्य रहाणेबद्दल क्रिकेट चाहत्यांचे मत वेगळे होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ ३६ धावांवर ऑल आऊट झाला अन् विराट कोहली रजेवर गेला होता. त्यानंतर अजिंक्यनं ज्या पद्धतीनं संघाचे नेतृत्व केलं अन् भारताला मालिका विजय मिळवून दिला, त्याचे साऱ्यांनी कौतुक केलं.
पण, आता त्याच अजिंक्यचं भविष्य आज बीसीसीआय व निवड समिती ठरवणार आहे. मागील १६ कसोटीत त्याला एकच शतक झळकावता आले आहे आणि त्याची सरासरी ५१.३७ वरून ३९.६० अशी घसरली आहे. २०२०त त्यानं ४ कसोटीत ३८.८६च्या सरासरीनं २७२ धावा केल्या, तर २०२१मध्ये १२ कसोटीत २०.३५च्या सरासरीनं ४०७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यानं दोन डावांत अनुक्रमे ३५ व ४ धावाच केल्या.
''ही खूप आव्हानात्मक परिस्थिती आहे. तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय, परंतु संघ व्यवस्थापन त्याच्या पाठिशी आहेत. त्याची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्याची निवड ही संपूर्णपणे संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे, परंतु त्याच्याबाबत अजूनही खात्री वाटत नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport शी बोलताना सांगितले.
दरम्यान, विराट कोहली हा भारताचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याच्या पावलावर पाऊल टाकण्याचा विचार करत आहेत. गांगुलीनंही वन डे क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला पाठींबा दिला आणि त्यानं १० हजाराहून अधिक धावा करून दाखवल्या. तसंच गांगुली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनिल कुंबळेच्या पाठिशी उभा राहिला होता आणि त्या दौऱ्यावर कुंबळेनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.