India squad T20 WC: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या स्पर्धेसाठी निवडलेला संघ ऑस्ट्रेलियात खेळेल असा अनेकांचा अंदाज आहे आणि त्यात तथ्यही आहे. जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे आणि हा एकमेव बदल ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात दिसणार आहे. अशात आर अश्विनच्या निवडीवरून काही माजी निवड समिती प्रमुखांनी नाराजी प्रकट केली आहे. त्यात भारताचा आणखी एक फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याला BCCI निवड समितीने त्याचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही, असे थेट सांगितले आहे. त्यामुळे अश्विनचे वर्ल्ड कप खेळण्याचे चान्स वाढले आहेत.
आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात वॉशिंग्टन सुंदरची निवड केली गेली नाही. त्याची निवड न झाल्याने कोणाला आश्चर्य बसण्याचं काहीच कारण नाही. कारण, तो बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा विचार झाला तर होऊ शकतो.
''भारतीय क्रिकेटसाठी तो एक एसेट आहे, परंतु सध्याच्या घडीला त्याने त्याच्या फिटनेसवर काम करण्याची गरज आहे आणि त्याच्या संधीची वाट पाहणे गरजेचं आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात आम्ही त्याच्याशी चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेत अश्विनला प्राधान्य दिलं जाईल. एखादा खेळाडू जखमी झाल्यास वॉशिंग्टन हा बॅक अप पर्याय असेल,''असे निवड समितीच्या सदस्याने InsideSport ला सांगितले.
वॉशिंग्टन सध्या कौंटी क्रिकेट गाजवतोय आणि त्याने लँसेशायरकडून पदार्पणाच्या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय दोन लिस्ट ए क्रिकेट सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. तंदुरुस्तीच्या कारणास्तव वॉशिंग्टन अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकला आहे. आयपीएल २०२२नंतर तो भारतासाठी खेळलेलाच नाही.