पणजी : के. सिल्व्हाचे शतक आणि चंदना देसप्रियाचे अर्धशतक यांच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडचा १० गड्यांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या मालिकेत अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता उद्या विजेतेपदासाठी होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सामना भारताविरुद्ध रंगणार आहे. श्रीलंका आणि भारत हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने विजेता कोण ठरणार, याची उत्सुकता आहे.
गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या मालिकेत शुक्रवारी श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी संथ सुरुवात केली. मात्र, खेळाच्या मध्यावर त्यांनी वेग घेतला. पीटर ब्लूईट्टचे अर्धशतक आणि इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या मौल्यवान योगदानाच्या जोरावर २० षटकांमध्ये ७ बाद १७९ धावा केल्या. जिंकण्यासाठी १८० धावांचा पाठलाग करणाºया श्रीलंकेच्या फलंदाजांनी हे आव्हान अगदी सहजरित्या पेलले आणि एकही फलंदाज न गमावता विजय मिळविला. के. सिल्व्हाने त्रिकोणीय मालिकेमधील आपले पहिले शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड २० षटकांत ७ बाद १७९. ब्ल्युईट ५४, सुग्ग ४९. सिल्वा १/८. श्रीलंका- १६.३ षटकांत बिनबाद १८१. सिल्वा १०४, देसप्रिया ६६. सामनावीरः के. सिल्वा.