Join us  

राहुल की ऋषभ, कोण खेळणार?; भारत-श्रीलंका वनडे मालिका आजपासून 

रोहित, कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 8:49 AM

Open in App

कोलंबो : यजमान श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संधी द्यावी, याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ व्यवस्थापनला घ्यावा लागणार आहे. त्याचवेळी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर एकी सामना न खेळणारा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. 

यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीसह काही महत्त्वाच्या वन डे स्पर्धा असल्याने संघ व्यवस्थापनाचा फोकस बाहेरच्या चर्चावर नव्हे तर योग्य संघ संयोजनावर असेल. यामुळेच राहुल की ऋषभ या मुद्दाला प्राधान्य दिले जाईल. पंत दुखापतीतून सावरण्याआधी राहुलने यष्टिरक्षकाची भूमिकेला योग्य न्याय दिला. त्याने फलंदाजीतही चुणूक दाखविली. राहुल द्रविड यांनी त्याच्यावर मोठा विश्वास टाकला होता. पण आता पंतचे पुनरागमन झाल्यामुळे गंभीर है डावखुऱ्या फलंदाजाला प्राधान्य देतील की द्रविडप्रमाणे राहुलवर विश्वास दर्शवतील, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

श्रीलंका संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. भारताला आव्हान देण्यासाठी त्यांच्या फलंदाजांना चमक दाखवावी लागेल. टी-२० मालिकेत मधली फळी ढेपाळली. जखमी खेळाडूंची समस्या कायम आहेच.

... तर श्रेयसचे काय?

गंभीर - रोहित यांनी राहुल आणि ऋषभ यांना अंतिम संघात खेळविल्यास श्रेयस अय्यरचे काय होणार? वन डेत श्रेयस चांगली कामगिरी करतो. भारतीय संघात फलंदाजांच्या दोन स्थानांसाठी राहुल, ऋषभ आणि श्रेयस यांच्यात चुरस जाणवते. या तिघांना खेळवायचे असेल तर संघात पाच गोलंदाज खेळवावे लागतील, अशी जोखीम पत्करण्याची शक्यता कमीच आहे, कारण हार्दिकने वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून माघार घेतली. सहाव्या स्थानासाठी शिवम दुबे - रियान पराग यांच्यात स्पर्धा असून, परागचे पारडे जड वाटते.

२०२७ साठी संघबांधणी

रोहित आणि कोहली यांची कामगिरी २०२७च्या वनडे विश्वचषकासाठी संघ बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. या दोघांनी मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर एकही वन डे खेळलेला नाही. ५० षटकांच्य सामन्यांत धडाका करण्यास दोघेही सज्ज असतील.

पहिली ODI आजपासून सुरू, दुपारी 1.30 पासून

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंका