Join us  

भारत- श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांची मालिका आजपासून; नवोदितांची अग्निपरीक्षा

‘आगामी टी-२० विश्वचषकात स्थान मिळवायचे असेल तर हीच संधी आहे,’ या निर्धारासह युवा भारतीय खेळाडू आज रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 7:20 AM

Open in App

कोलंबो : ‘आगामी टी-२० विश्वचषकात स्थान मिळवायचे असेल तर हीच संधी आहे,’ या निर्धारासह युवा भारतीय खेळाडू आज रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होत असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे मर्यादित षटकांच्या मालिकेत चुणूक दाखविण्यास सज्ज आहेत. येथे आलेल्या भारतीय संघात अनेक स्टार खेळाडूंची उणीव असली तरी जे दौऱ्यावर आले त्यांच्यात सहा सामन्यात शानदार कामगिरी करण्याची खुमखुमी जाणवते.

आंतरराष्ट्रीय दौऱ्यात विजय मिळविणे प्रमुख लक्ष्य असते. भारतीय व्यवस्थापन मात्र विजयासोबतच नवीन संयोजन तयार करण्याच्या हेतूने प्रयोगशील राहणार आहे. यजमान संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने दौऱ्याला पाच दिवस उशिरा सुरुवात होत आहे. मालिकेत तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. दासून शनाका हा मागील चार वर्षांत राष्ट्रीय संघाचा दहावा कर्णधार असेल. धनंजय डिसिल्व्हा आणि दुष्मंता चामिरा यांचा अपवाद वगळता शिखर धवनच्या संघाला कडवे आव्हान देईल असा एकही खेळाडू यजमान संघात नाही. ब्रिटनमध्ये बायोबबलच्या उल्लंघनामुळे कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला हे निलंबनामुळे आणि माजी कर्णधार कुसाल परेरा जखमी असल्याने बाहेर आहे. इंग्लंडमधील खराब कामगिरीनंतरही श्रीलंकेने बाजी मारल्यास त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. भारताचे २० खेळाडू नियमित टी-२० खेळतात. त्यातील सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. प्रत्येकाला संधी मिळणे कठीण असेल,असे द्रविड यांनी स्पष्ट केलेच आहे.

युवा चेहरे परस्परांचे स्पर्धक

- पृथ्वी शॉ, धवन, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर प्रत्येक सामना खेळतील, हे निश्चित पण अन्य स्थानांसाठी एकापेक्षा अधिक दावेदार आहेत. नंबर तीनसाठी देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड तसेच त्यानंतरच्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव आणि मनीष पांडे यांच्यात स्पर्धा असेल.

- ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौतम की कृणाल पांड्या, राहुल चहर की युजवेंद्र चहल अशी स्पर्धा आहे. याशिवाय अनुभवी कुलदीप यादवदेखील स्पर्धेत असेल. यष्टिरक्षकासाठी इशान किशन- संजू सॅमसन दावेदार आहेत. अनुभवी कोच राहुल द्रविड यांना पुढील ११ दिवस अंतिम एकादश निवडताना डोके खाजवावे लागेल. या मालिकेद्वारे द्रविड हे मुख्य राष्ट्रीय संघासाठी पर्यायी खेळाडू देण्याच्या स्थितीत आहेत.

सामना : दुपारी ३ वाजेपासून (भारतीय वेळेनुसार)

उभय संघ यातून निवडणार

भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक ), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोड भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रेमा, असिथा फर्नांडो, कासुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.

टॅग्स :टी-20 क्रिकेटश्रीलंकाभारत