पल्लेकल, दि. 13 - तिस-या कसोटीच्या दुस-याच दिवशी श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत आहे. भारताच्या 487 धावांना उत्तर देताना त्यांचा पहिला डाव अवघ्या 135 धावांमध्ये गडगडला. त्यामुळे भारतापेक्षा 352 धावांनी पिछाडीवर राहिलेल्या लंकेच्या संघावर फॉलोऑनची नामुष्की आली. 352 धावांचा फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या लंकेच्या दुस-या डावाची सुरूवातही खराब झाली. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी त्यांच्या दुस-या डावात एकगडी बाद 19 धावा झाल्या आहेत. अजूनही भारतापेक्षा 333 धावांनी ते पिछाडीवर आहेत. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने ठोकलेल्या तुफानी शतकाच्या हाद-यातून लंकेचा संघ बाहेर येण्यापूर्वीच मोहोम्मद शमी, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांनी भेदक गोलंदाजी करत लंकेच्या संघाला हादरवलं. भारताच्या अचूक गोलंदाजीपुढे चंदीमाल (63) वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही, आणि त्यांचा डाव 135 धावांमध्येच गडगडला. भारताकडून मालिकेत पहिलाच सामना खेळणा-या चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने चार विकेट घेऊन लंकेचं कंबरडं मोडलं. त्याला मोहोम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेऊन चांगली साथ दिली. तर शतकवीर हार्दिक पांड्यानेही एक विकेट घेत गोलंदाजीत आपली चमक दाखवली.
त्यापूर्वी भारतीय संघाने आज खेळायला सुरुवात केल्यावर वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्याने संयमी सुरुवात केली. मात्र सावध खेळत असलेला साहा 16 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पांड्याने कुलदीप यादवसोबत (26) 61 धावांची भागीदारी करत संघाला चारशेपार मजल मारून दिली. कुलदीप बाद झाल्यावर पांड्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. यादरम्यान, त्याने मालिंदा पुष्पकुमाराच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांसह 26 धावा वसूल केल्या. पांड्याने त्यानंतरही लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत अवघ्या 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कालच्या 6 बाद 329 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने आज उपाहारापर्यंतच्या खेळात आपल्या धावसंख्येत 158 धावांची भर घातली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 9 बाद 487 धावा झाल्या होत्या. मात्र उपाहारानंतर भारताचा डाव लांबला नाही. पांड्याला 108 धावांवर बाद करत लक्षण सँडकनने भारताचा डाव 487 धावांवर संपु्ष्टात आणला. सँडकनने पाच बळी टिपले. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे सहावे कसोटी शतक आणि त्याने लोकेश राहुलसोबत सलामीला केलेल्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे यजमान श्रीलंकेने भारताला पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२९ धावांत रोखले.