ICC T20 Rankings : भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा निर्णयक ट्वेंटी-२० सामना आज अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) याला गुड न्यूज मिळाली आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्याने अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना कारकीर्दितील सर्वाधिक रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात सूर्याने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती आणि त्याचाच फायदा त्याच्या रेटिंग पॉईंट्समध्ये झाला.
सूर्यकुमार यादव २ नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिजवान याला मागे टाकून ट्वेंटी-२०तील नंबर १ फलंदाज बनला होता. त्यानंतर तो अव्वल स्थानावर कायम आहे आणि त्यावरील पकड अधिक मजबूत करत चालला आहे. सूर्यकुमार यादवचे ९१० पॉईंट्स झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद रिजवानचे ८३६ पॉइंट्स आहेत.
न्यूझीलंडच्या फिन अॅलननेही ८ स्थानांची झेप घेत १९ वा, तर डॅरील मिचेलने ९ स्थानांच्या सुधारणेसह २९वा क्रमांक पटकावला आहे. किवी कर्णधार मिचेल सँटनर याने अष्टपैलू कामगिरी करून मोठी झेप घेतली. ३० वर्षीय गोलंदाज ९व्या क्रमांकावर आला आहे आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये पाच स्थानांच्या सुधारणेसह २३व्या स्थानावर आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"