नवी दिल्ली : स्टार फलंदाजांचा भरणा असल्यानंतरही भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीचे कौशल्य आणि नेतृत्वाची उणीव जाणवत असल्याचे मत वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी व्यक्त केले आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघात धोनी असायला हवा होता, असे वाटत असल्याचे होल्डिंग म्हणाले.
ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ६६ धावांनी पराभव झाल्यानंतर स्वत:च्या यू ट्यूब चॅनलवरील ‘होल्डिंग नथिंग बॅक’या कार्यक्रमात ते म्हणाले,‘भारतासाठी लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होते. धोनीची संघाला उणीव जाणवली. धोनी मधल्या फळीत फलंदाजीला यायचा. लक्ष्याचा पाठलाग करताना तो खेळावर नियंत्रण मिळवित असे. त्याने अनेकदा लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे. भारतीय संघात अनेक प्रतिभवान फलंदाज असून फटकेबाजीतही तरबेज आहेत. हार्दिकने शानदार फलंदाजी केली, मात्र धोनीची उणीव जाणवली. धोनी असताना भारतीय संघ धावांचा लाठलाग करताना निश्चिंत असायचा. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारायला तो भित नव्हता. माझे फलंदाज किती सक्षम आहेत, शिवाय एमएस काय करू शकतो, याची त्याला कल्पना असायची. तो विचलित न होता, विजयावर शिक्कामोर्तब होईस्तोवर सहकारी फलंदाजाला धीर देत असे.’
- भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणावर होल्डिंग यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘एससीजीसारख्या मोठ्या मैदानावर भारतीय खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षण केले. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूृंच्या डोक्यावरुन चेंडू निघून गेले. हे चेंडूृ षटकार नव्हते. माझ्या मते या क्षेत्ररक्षकांनी सीमारेषेपासून दूर उभे रहायला नको होते.’
- यापुढे भारतीय संघाला धावसंख्येचा पाठलाग करणे नेहमी कठीण जाणार आहे. धोनीचा संघात नसल्याचा हा मोठा फटका भारतीय संघाला बसणार आहे, या शब्दात त्यांनी विश्लेषण केले आहे.