लंडन : विराट कोहलीने वर्तमान भारतीय संघात कधी पराभव न स्वीकारण्याची वृत्ती रुजवली. त्यामुळे टीम इंडिया मैदानात व मैदानाबाहेर प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडचणीत येत नाही, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले. कर्णधार कोहली व काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतरही भारताच्या अनुभवहीन संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दृढता व संकल्प याचे शानदार उदाहरण सादर करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करीत चार सामन्यांच्या मालिका २-१ ने जिंकली.हुसेनने इंग्लंडला पाच फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये प्रारंभ होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कडव्या आव्हानाला सज्ज राहण्यास सांगितले आहे.
हुसेन म्हणाला, ‘कुठलाही संघ जो ऑस्ट्रेलियात ३६ धावांत गारद झाल्यामुळे ०-१ ने पिछाडीवर पडला होता, त्यात पितृत्व रजेसाठी कोहलीला गमावले होते, ज्यांचे गोलंदाजी आक्रमण कमकुवत झाले होते आणि त्यानंतर तो संघ मैदानात व बाहेरही समर्पण कायम राखत पुनरागमन करीत असेल तर त्यांच्यावर दडपण आणता येत नाही.’
हुसेन म्हणाला, ‘भारत आता कणखर संघ बनला आहे. माझ्या मते, कोहलीने संघात ही भावना रुजवली आहे. मायदेशात हा संघ अधिक मजबूत आहे.’ श्रीलंकेविरुद्ध २-० ने विजय मिळविल्यामुळे इंग्लंड संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे, पण हुसेनने म्हटले आहे की, पाहुण्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी सर्वोत्तम संघाची निवड करायला हवी. हुसेनने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जॉनी बेयरस्टोची निवड करण्यात आली नसल्यामुळे आक्षेप व्यक्त केला.
हुसेन म्हणाला, ‘खडतर आव्हानापूर्वी त्यांनी श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली, हा चांगला संकेत आहे. ॲशेज, भारताविरुद्ध मायदेश व विदेश, न्यूझीलंडमध्ये मालिका सोप्या नसतात, पण इंग्लंड संघ आत्मविश्वास व विजयी कामगिरीसह भारताविरुद्ध मालिका खेळण्यास जात आहे. माझा जन्म भारतात झाला आणि मी नेहमी भारत विरुद्ध इंग्लंड सर्वश्रेष्ठ मालिकांपैकी एक मानतो. माझे एवढेच मत आहे की आपल्या सर्वोत्तम १३-१५ खेळाडूंसह चेन्नईमध्ये खेळावे.’