India T20 Captain: भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड दक्षिण आफ्रिकेने रोखली. आज भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे आणि पुन्हा विजयपथावर परतून उपांत्य फेरीचे स्थान पक्के करण्याचा निर्धार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ( Rohit Sharma) भारतीय संघ १५ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा दुष्काळ संपवेल, अशी अनेकांना आशा आहे. संघाची कामगिरीही दमदार सुरू आहे, परंतु अशात पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित ट्वेंटी-२० संघाचा कर्णधारपद नसेल, अशी माहिती समोर येतेय. विराट कोहली ( Virat Kohli) याच्याबाबतही BCCI च्या डोक्यात वेगळाच विचार सुरू असल्याचे समोर येतेय.
२०२४ ला होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन BCCI आतापासूनच तयारीला लागली आहे. भारताच्या तीनही फॉरमॅटच्या संघाचा कर्णधार रोहित पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार राहणार नाही. BCCI ही जबाबदारी हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) खांद्यावर सोपवण्याचा विचार करत आहे. त्याच्याशिवाय रिषभ पंतही या शर्यतीत आहेच. २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लोकेश राहुल ( KL Rahul) याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. दरम्यान, विराट कोहलीला केवळ कसोटी व वन डे सामन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले जाऊ शकते आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोठ्या मालिकेतच त्याला खेळता येणार आहे.
रोहित शर्मा ३५ आणि विराट कोहली ३४ वर्षांचा आहे. या दोघांनी बरीच वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे आणि आता फार काळ ते खेळणार नाहीत, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या पिढीला घडविण्यासाठी आणि रोहितला सक्षम पर्याय शोधण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्याचे वृत्त Inside.sports ने दिले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना निवड समिती व बीसीसीआय यांच्यात रोहित व विराट यांच्याशी भविष्याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
''या दोघांना क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून निवृत्त व्हा, अशी सक्ती करणार नाही, परंतु ते पस्तीशीत आले आहेत आणि देशाचे ते दोन महत्त्वाचे खेळाडू आहे. त्यांना रोटेट करणे आणि महत्त्वाच्या स्पर्धांसाठी सज्ज राहण्यासाठी पुरेशी विश्रांती देणे गरजेचे आहे. मात्र, कर्णधाराला सतत रोटेट केले जाऊ शकत नाही. ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकेश किंवा रिषभ यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे,'' असे BCCI च्या अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का?
- नाही, २०२३च्या वर्ल्ड कप पर्यंत रोहित शर्मा तीनही फॉरमॅटचे नेतृत्व सांभाळणार आहे
- २०२३नंतर रोहित शर्मा वन डे व कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष्य करणार आहे
- हार्दिक पांड्या, लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांच्याकडे ट्वेंटी-२० चे नेतृत्व टप्प्याटप्प्याने वाटून दिले जाईल
- दुखापती आणि तंदुरुस्ती लक्षात घेता रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ पर्यंत कर्णधारपदावर कायम राहणार नाही
''हार्दिक व रिषभ या दोघांनी नेतृत्वकौशल्य सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा दोघांकडे अनुभव आहे आणि त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी बराच कालावधी आहे. हार्दिकने आयपीएल जिंकून स्वतःला सिद्ध केले आहे. लोकेश राहुल हा रोहित व विराटसोबत राहून शिकतोय,''असेही अधिकारीने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"