India T20 WC squad announced : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही, हे जवळपास निश्चित होते. त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता होती. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांचे तंदुरूस्त होणे ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मोहम्मद शमीच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. दुपारी १ वाजल्यापासून मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघ निवडीसाठी बैठक सुरू झाली. सलामीवीर, रिषभ पंत, रवींद्र जडेजाची रिप्लेसमेंट, मोहम्मद शमी व आर अश्विन यांचा समावेश आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
जडेजाला रिप्लेसमेंट म्हणून दीपक हुडा व अक्षर पटेल यांची संघात निवड केली गेली आहे. मोहम्मद शमी संघात परतला आहे, परंतु त्याची राखीव खेळाडूंमध्ये निवड केली गेली आहे. 15 सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांचे पुनरागमन वगळल्यास फार बदल झालेला नाही. आशिया चषकात अपयशी ठरलेल्या आवेश खानला विश्रांती दिली गेली आहे.
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान ( फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे ( जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ पहिल्या राऊंडमध्ये Super 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. ( Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (WK), Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, R. Ashwin, Y Chahal, Axar Patel, Jasprit Bumrah, B Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh) राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर ( Standby players - Mohd. Shami, Shreyas Iyer, Ravi Bishnoi, Deepak Chahar)