India T20 WC Squad : ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआय भारतीय संघात प्रयोग करताना दिसतेय... प्रत्येक मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम सध्या सुरू आहे, त्यात वर्कलोडचं निमित्त पुढे करून सीनियर खेळाडू विश्रांती घेताना दिसत आहेत. भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार आहे आणि ही मालिका विराट कोहली ( Virat Kohli) साठी अखेरची संधी असल्याची चर्चा होतेय. विराटने या मालिकेत फॉर्म दाखवला नाही, तर त्याला बीसीसीआय आणखी संधी देणार नाही. कामगिरी कर अन्यथा बाहेरचा रस्ता, असा इशाराच जणू बीसीसीआयने दिला आहे.
InsideSport शी बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाला, विराट हा भारतीय क्रिकेटचा ग्रेट सेवक आहे. तो बेस्ट खेळाडूंपैकी एक आहे, यात शंकाच नाही, परंतु तो सध्या फॉर्माशी झगडतोय. निवड समितीने आता खेळाडूची निवड ही त्याच्या फॉर्म पाहून करायला हवी, त्याची पत पाहून नव्हे. मला हे बोलण्याचा अधिकार नाही, परंतु त्याने आता लवकरच फॉर्म मिळवायला हवा. कामगिरी करा किंवा संघाबाहेर व्हा... इंग्लंड मालिकेत त्याच्या अपयशाचा पाढा कायम राहिल्यास, निवड समिती ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करेल, असे मला वाटते.
बीसीसीआय आणि निवड समिती आता विराटला आणखी संधी देण्याच्या कोणत्याच मुडमध्ये नाहीत.TOI ने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड मालिका ही विराटसाठी महत्त्वाची आहे. विराट पहिल्या ट्वेंटी-२० खेळणार नाही, याचा अर्थ त्याला दोनच सामने मिळणार आहेत. ''वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी रोहित, पंत आणि पांड्या हे खेळणार आहेत. बुमराह कॅरेबियन दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी संघ व्यवस्थापन काय विचार करतोय, यावर विराटचे भवितव्य अवलंबून आहे. अशात इंग्लंडविरुद्धची मालिका त्याच्यासाठी अखेरची संधी आहे,''असे TOI ने वृत्त दिले आहे.
विराट कोहलीची ट्वेंटी-२० तील कामगिरी
- ९७ सामने/ ३२९६ धावा / ५१.५ ची सरासरी
- मागील सहा महिन्यांत विराटची सरासरी २६च्या खाली आली आहे
- नोव्हेंबर २०१९नंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेलं नाही
- सर्व फॉरमॅटमध्ये त्याची बॅटिंग सरासरी घसरत चालली आहे
- आयपीएल २०२२मध्ये त्याने १६ सामन्यांत २२.७३च्या सरासरीने ३४१ धावा केल्या
- भारताकडे सध्याच्या घडीला मधल्या फळीसाठी सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दीपक हुडा, संजू सॅमसन व श्रेयस अय्यर आदी पर्याय आहेत.