India T20 WC Squad why Mohammed Shami drafted as a standby? भारतीय चाहते ज्याची प्रतीक्षा पाहत होते, तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ अखेर जाहीर झाला. BCCI ने सोमवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आणि तीन राखीव खेळाडूंची निवड केली. रवींद्र जडेजा व आवेश खान ही दोन नावं वगळल्यास आशिया चषक २०२२ मध्ये खेळणाराच संघ कायम आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीतील उणीवा प्रकर्षाने जाणवल्या, परंतु आता संघ मजबूत वाटतोय. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याला राखीव खेळाडू म्हणून निवडून निवड समितीने मोठा गेम प्लान खेळला आहे.
भारताच्या वर्ल्ड कप संघात जसप्रीत, हर्षल, भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग हे चार जलदगती गोलंदाज आहेत. भुवीचे संघात असणे अपेक्षित होतेच, अर्शदीपने कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले. हार्दिक पांड्या हा पाचव्या जलदगती गोंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी सज्ज आहेच. सूत्रांच्या माहितीनुसार, निवड समितीच्या बैठकीत शमी व आर अश्विन यांच्यापैकी मुख्य संघात कोणाला स्थान द्यायचे यावर बरीच चर्चा झाली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी अश्विनसाठी आग्रह धरला अन् निवड समितीला त्यांची मागणी मान्य करावी लागली. अश्विनचा अनुभव आणि अन्य संघात डावखुऱ्या फलंदाजांचा असलेला भरणा पाहून संघ व्यवस्थापनाने अश्विनला प्राधान्य दिले.
निवड समितिचे माजी सदस्य साबा करीम यांनी म्हटले की,जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांच्या तंदुरुस्तीवर अद्यापही शंका आहेच, म्हणून मोहम्मद शमीची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली असावी. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत शमीला मुख्य संघात घेतले आहे.'' ''जर मी निवड समितीचा प्रमुख असतो तर मोहम्मद शमी संघात असता. आपण ऑस्ट्रेलियात खेळणार आहोत आणि तेथील उसळी घेणाऱ्या खेळपट्टींवर शमी उपयुक्त ठरला असता. त्याने सुरुवातीलाच आपल्याला विकेट्स मिळवून दिल्या असत्या,''असे निवड समितीचे माजी प्रमुख कृष्णमचारी श्रीकांत यांनी म्हटले.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर