INDIA T20 WC Squad : भारतीय संघाच्या घरच्या मैदानावरील मालिका संपल्या आता परदेशवारी सुरू झाली आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर निवड समिती व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांचे बारीक लक्ष आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रत्येक सहभागी संघांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघ जाहीर करण्याची निर्देश आयसीसीने दिले आहे. टीम इंडियाला अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी अजून चार मालिका खेळायच्या आहेत आणि त्यानंतर द्रविड व निवड समिती निर्णय घेणार आहे.
तीन वर्षांनंतर दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) केलेले कमबॅक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. फिनिशरच्या भूमिकेत त्याला पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. अशात रिषभ पंत फॉर्मशी झगडताना दिसतोय. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. त्यामुळे संघातील चुरस अधिक वाढली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आदींचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. 1-2 जागांसाठी चुरस रंगताना दिसणार आहे. त्यामुळे आगामी चार मालिकांवर निवड समितीचे बारीक लक्ष असेल.
ट्वेंटी-20 मालिका
- भारत वि. आयर्लंड - 2 सामने - 26 व 28 जून
- भारत वि. इंग्लंड - 3 सामने - 7 ते 10 जुलै
- भारत वि. वेस्ट इंडिज - 3 सामने - 27 जुलै ते 2 ऑगस्ट
- आशिया चषक ट्वेंटी-20 - 27 ऑगस्टपासून सुरूवात ( अद्याप अधिकृत घोषणा नाही)
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. इंग्लंडविरुद्धचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत कायम ठेवला जाईल. हाच संघ आशिया चषक स्पर्धेत खेळेले आणि त्यानंतर वर्ल्ड कप संघाची घोषणा होईल.
भारतीय संघासमोर प्रश्न...
- रोहित शर्मा व लोकेश राहुल यांना बॅकअप ओपनर कोण?
- फॉर्मचा विचार केल्यास विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर योग्य आहे का?
- चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्यात चुरस रंगणार?
- दिनेश कार्तिक की रिषभ पंत, पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक कोण असणार?
- युजवेंद्र चहलसोबत दुसरा फिरकीपटू कोण?
- जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार हे वगळता दोन जलदगती गोलंदाज कोण?
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
- 23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
- 27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
- 30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
- 2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
- 6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न