India vs Pakistan, Asia Cup 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही, असे वारंवार सांगण्यात आले असूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) याबाबत BCCI कडून लेखी उत्तर हवे आहे. या सर्व गोंधळादरम्यान आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. यामुळे पाकिस्तानची बोलती बंद होणार हे स्पष्ट आहे. आशिया कप २०२५चे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट संघालाच पुढील वर्षी भारताचा दौरा करावा लागणार आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, भारत २०२५ मधील आशिया कप स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. ही स्पर्धा टी२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) २०२४ ते २०२७ या कालावधीमधील विविध स्पर्धांसाठी उत्सुक असलेल्या यजमानांसाठी Invitation for Expressions of Interest (IEOI) जारी केले. त्यात आशिया चषक २०२५चे यजमानपद भारताकडे तर आशिया चषक २०२७ चे यजमानपद बांगलादेशकडे देण्यात आले आहे. दोनही स्पर्धांमध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि सहावा संघ पात्रता फेरीद्वारे निश्चित होईल. दोनही स्पर्धांमध्ये १३ सामने खेळवले जातील.
आशिया कप २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण त्यावेळेसही भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते तर श्रीलंकेने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.