ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मधील भारताच्या सराव सामन्यांबाबत अनेक वेगवेगळे वृत्त समोर आले होते. . क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा अँड टीम मुख्य स्पर्धेपूर्वी एक सराव सामना खेळणार आहे, कारण आयपीएल २०२४ मुळे भारतीय खेळाडू प्रचंड थकले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक सराव सामना आयोजित करण्यात येणार आहे. त्याच वृत्तता असेही म्हटले आहे की संघ न्यूयॉर्कमध्ये तो सामना खेळण्यास उत्सुक आहे, कारण फक्त सराव सामन्यासाठी त्यांना फ्लोरिडाला जायचे नाही.
आता, ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताचा एकमेव सराव सामना १ जून रोजी न्यूयॉर्कमधील आयझेनहॉवर पार्क येथे बांगलादेशविरुद्ध होणार आहे. याच ठिकाणी ९ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना होणार आहे. आयसीसीच्या इव्हेंटचे प्रमुख ख्रिस टेटली यांनी सांगितले की, IND vs PAK सामन्याची तिकिटे अद्याप उपलब्ध आहेत. लोकांना कोणत्याही सामन्याची तिकिटे खरेदी करण्याच्या मर्यादित संधी आहेत. सर्व सामन्यांची काही तिकिटे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भारतीय संघ सुरुवातीला आयपीएल लीग स्टेजच्या समाप्तीनंतर लगेचच २१ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होता. पण, आता संघ २५ व २६ मे रोजी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद